अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार प्रस्तावित कामं विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी आणि नागरिकांना नागरी सेवासुविधा देता याव्यात याकरिता ठाणे महापालिकेचा २०२०-२०२१ चा अर्थसंकल्प ३१ मार्च पूर्वी मंजूर करण्यासाठी प्रशासन आणि स्थायी समितीनं वेळीच कार्यवाही करावी असं पत्र महापौरांनी दिलं आहे. या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प प्रशासनाकडून स्थायी समितीस सादर होतो आणि त्यानंतर स्थायी समितीनं मंजूर केल्यावर तो सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला जातो. गेली काही वर्ष या ना त्या कारणानं अर्थसंकल्प ३१ मार्च पूर्वी मंजूर होत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळं त्याचा विपरित परिणाम नागरी सुविधा कामांवर होतो. विकासकामं वेळेवर होत नसल्यानं नागरिकांचा रोष स्थानिक लोकप्रतिनिधींवर व्यक्त होतो. त्यामुळं पुढील काळातील अर्थसंकल्प विहित मुदतीत मंजूर करून नियोजित कामं वेळेत व्हावीत या दृष्टीकोनातून सन २०२०-२०२१ चा अर्थसंकल्प ३१ मार्च पूर्वी मंजूर होईल या दृष्टीनं कार्यवाही करण्याची सूचना महापौरांनी एका पत्राद्वारे प्रशासन आणि स्थायी समितीला केली आहे.