नागरिकता कायदा दुरूस्ती अंमलबजावणी प्रकरणात न्याय न मिळाल्यास कागज नही दिखाएंगे सत्याग्रह करण्याचा इशारा

नागरिकता कायदा दुरूस्ती अंमलबजावणी प्रकरणात न्याय मिळाला नाही तर महात्मा गांधींच्या शिकवणुकीनुसार नागरिकता दुरूस्ती कायदा धर्माधारित भेदभाव करणारा आणि संविधानाच्या आत्म्याशी फारकत घेणारा असल्यानं त्याविरूध्द कागज नही दिखाएंगे हा सत्याग्रह युवक करतील असा इशारा ठाण्यातील युवा टॉक शो मध्ये युवकांनी दिला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यान मालिकेच्या समारोपाच्या १५व्या पुष्पात महात्मा गांधी स्मृतीदिनानिमित्त संविधान, नागरिकता आणि युवकांचे हक्क या विषयावर समता विचार प्रसारक संस्थेतर्फे एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात युवकांनी हा इशारा दिला. या देशात जो राहतो तो या देशाचा नागरिक. त्याच्याकडून नाहक पुरावे मागणे हे गोरगरिब, प्रकल्पग्रस्त, आदिवासी अशांसाठी जिकीरीचं ठरू शकते. केवळ राष्ट्रध्वजाचा किंवा राष्ट्रगीताचा मान म्हणजे भारतीयत्व नाही तर आपापल्या जबाबदा-या नेकीनं पार पाडणं, भ्रष्टाचार, अन्याय न करणं हे खरं भारतीयत्व आहे. देशातील वाढती महागाई, सार्वजनिक उद्योग सावरणे, विकासाचा दर सुस्थितीत राखणे हे सरकारला जमत नसल्यामुळे नागरिकता कायदा दुरूस्ती, त्यापाठोपाठ नागरिक नोंदणी आणि जनसंख्या नोंदणी हेही अनावश्यक असल्याचं मत या चर्चासत्रात युवकांनी मांडलं. देश स्वतंत्र झाला त्यावेळी फाळणीला आणि धर्माधिष्ठीत पाकिस्तानला जाण्यास नकार देऊन भारतीय मुस्लिमांनी आपली धर्मनिरपेक्षता सिध्द केली आहे. सद्यस्थितीत नागरिकता दुरूस्ती कायदा आणि त्यानंतर अपेक्षित जनसंख्या आणि नागरिक नोंदणीतून या देशाला धर्मानिष्ठीत राष्ट्र बनू न देणं ही हिंदू धर्मात जन्मलेल्या नागरिकांची जबाबदारी आहे अशा शब्दात संजय मंगला गोपाळ यांनी उपस्थितांना जबाबदारीची जाणीव करून दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading