ठाणे रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवाशांसाठी खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याने प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर नव्याने उभारण्यात आलेल्या प्रतीक्षालयाचे लोकार्पण खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार राजन विचारे यांच्या सततच्या पाठपुराव्याने ठाणे रेल्वे स्थानकातील जुनी इमारत निष्कासित करून ठाणे रेल्वे स्थानकाचा विकसित आराखडा तयार केला होता. वारंवार संसदेत ठाणे रेल्वे स्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्थानक करण्यासाठी मुद्दा उपस्थित केला होता. याची दखल घेऊन रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील १० रेल्वे स्थानकांच्या विकास कामांमध्ये ठाणे रेल्वे स्थानकाचा समावेश करून प्लॅटफॉर्म लेव्हल, रूप प्लाझा लेव्हल अशी तळमजला+२ दोनमजली इमारत तयार करून विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याने खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रबंधक, रेल्वे महाव्यवस्थापक तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री या सर्वांचे रेल्वे प्रवाश्यांच्या वतीने आभार मानले आहेत. रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा वाढणारा अतिरिक्त भार लक्षात घेता या जुन्या इमारतीच्या जागेवर प्रतीक्षालय उभारून रेल्वे प्रवाशांसाठी आज खुला करण्यात आला आहे. खासदार राजन विचारे यांनी या प्रतीक्षालयामध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे विनंती केली आहे. रेल्वे प्रवाशांना विनाकारण फलाटावर उभे राहून गाडीची प्रतीक्षा करावी लागत होती ती आत्ता होणार नाही. त्यामुळे या नवीन उभारण्यात आलेल्या प्रतीक्षालयात लोकल गाड्यांचे आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे इंडिकेटर बसविण्यासाठी आपला खासदार निधी रेल्वे प्रशासनाला उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.