प्रदूषण करणारा कारखाना बंद झाल्यामुळे ग्रामस्थांच्या संघर्षाला यश

शेती, फळबागांसह मानवी आरोग्यावर घातक परिणाम करणारा आंबिस्ते येथील अल्युमिनियम कारखाना अखेर बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले. आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवल्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आल्याने ग्रामस्थांच्या दहा वर्षांच्या संघर्षाला यश आले आहे.


वाडा तालुक्यातील आंबिस्ते गावात अल्युमिनियम धातुवर प्रक्रिया करून विविध वस्तू बनवणारा जी.के. फाऊंडर्स हा कारखाना असून त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्याचा दुष्परिणाम गावातील शेती, फळबागा आणि मानवी आरोग्यावर होत होता. ही कंपनी बंद करण्यात यावी यासाठी गेली दहा वर्षे येथील ग्रामस्थ लढा देत आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून वाडा तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले होते. याची माहिती भाजपाचे पालघर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी आमदार संजय केळकर यांना फोनवरून दिली. केळकर यांनी तत्काळ हा विषय अधिवेशनात मांडून प्रकरणाचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले तसेच कंपनी तत्काळ बंद करण्याची मागणी केली. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने तत्काळ कंपनी बंद करण्याचे आदेश कंपनी प्रशासनाला दिले. अनेकवेळा या कंपनीविरोधात ग्रामस्थांनी उठाव केला पण परिणाम शून्य मिळाला. मधल्या काळात केवळ सात दिवसांकरिता कंपनी बंद करण्यात आली परंतु पुन्हा अधिकाऱ्यांच्या संगनमताने ती सुरु झाली. अखेर 19 जुलै रोजी सर्व गाव उपोषणाला बसला. स्थानिक पदाधिकाऱ्यांसह ठाण्याचे आमदार संजय केळकर यांची शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली. केळकर यांचा मतदारसंघ नसतानाही त्यांनी तत्काळ दखल घेत न्याय मिळवून देण्याबाबत आश्वासित केले आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा तातडीने पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित केला आणि प्रशासन लगेच कामाला लागले. कंपनी बंद करण्याचे आदेश निघाल्यानंतर ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading