गस्त घालणा-या रेल्वे पोलीसाच्या सतर्कतेमुळं एका प्रवाशाचा जीव वाचू शकला. ठाणे रेल्वे स्थानकावर मंगळवारी रात्री साधारणत: साडेदहाच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल अनिलकुमार हे नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. ही गस्त घालत असतानाच त्यांना एक प्रवासी रेल्वे मार्गातून फलाट क्रमांक ६ वरून ७ वर येताना दिसला. त्याचवेळी फलाट क्रमांक ७ वर एक रेल्वे येत होती. ही रेल्वे शिट्टी वाजवत होती. पण या प्रवाशाचं त्याकडे लक्ष नव्हतं. पण रेल्वे बघून हा प्रवासी गोंधळून गेला होता. हे पाहून अनिलकुमार यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे मार्गावर उडी मारली आणि प्रवाशाला फलाट क्रमांक ७ वर उचलून घेतलं. हे दृश्य पाहून रेल्वेच्या चालकानं तातडीचे ब्रेक दाबले आणि रेल्वे थांबवली. यानंतर या प्रवाशाला रेल्वेच्या चौकीत आणण्यात आलं आणि त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यानं त्याचं नाव बबन सोनावणे असल्याचं सांगितलं आणि आपण आपल्या कुटुंबाबरोबर जालन्याला जात असून आपलं कुटुंब फलाट क्रमांक ७ वर उभं होतं. पण सोनावणे स्वत: फलाट क्रमांक ६ वर होते. त्यांनी गाडी येताना पाहून गाडी पकडायच्या घाईत फलाट क्रमांक ७ वर जाण्यासाठी रेल्वे मार्गात उडी मारली. अनिलकुमार त्याचवेळी सतर्कता दाखवल्यानं बबन सोनावणे यांचा जीव वाचू शकला.