शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि खासदार श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मुंबई शहर आणि उपनगरांत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांसाठी मोफत कोरोना तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. कृष्णा डायग्नोस्टिक या खाजगी लॅबद्वारे स्वॅब तपासणी करण्यात आली. ठाणे विश्रामगृहाच्या आवारात झालेल्या या शिबिरात एकूण 18 पत्रकारांची आणि 4 पोलिसांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मुंबई शहर आणि उपनगरांतील वृत्तांकन करणाऱ्या सर्व खाजगी वृत्तवाहिनीमधील पत्रकार, कॅमेरामन, वृत्त निवेदक यांचा समावेश होता. आत्तापर्यंत झालेल्या एकूण 10 शिबिरांत 750 पत्रकार आणि पोलिसांच्या कोरोना तपासणी चाचण्या झाल्या असून या तपासणीत 20 पत्रकार कोरोनाग्रस्त आढळले आहेत. या पत्रकारांना कोविड हॉस्पिटलमध्ये योग्य उपचारासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे.