कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं ठाणे महापालिकेनं कासारवडवली येथे ४० खाटांची अलगीकरण सुविधा निर्माण केली असून या ठिकाणी दाखल होणा-या व्यक्तींना १४ दिवस ठेवलं जाणार असून त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरोनाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात येत असून शहरातील ३० पेक्षा अधिक महत्वाच्या ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. शहरातील प्रत्येक गृहसंकुलात जनजागृतीबाबत पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सर्व स्थानिक वृत्तपत्रात जाहिराती देण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व बँकांना जनजागृतीपर स्टँडी पोस्टर्स लावण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. नागरिकांनी जागरूक राहून कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी काळजी घ्यावी तसंच आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये आणि गर्दीत जाणे टाळावे असं आवाहनही करण्यात आलं आहे.