आधी मैदान मगच भूमिगत वाहनतळाचे लोकार्पण

नौपाड्यातील बहुचर्चित भूमिगत वाहनतळावरील गावदेवी मैदान ऑक्टोबर अखेरपर्यंत वापरण्यायोग्य करावे. असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले असले तरी अद्याप हे काम रेंगाळलेलेच आहे. मैदान पुर्ववत केल्याशिवाय वाहनतळाचे लोकार्पण करू देणार नाही. असा पवित्रा भाजपच्या स्थानिक माजी नगरसेवकांनी घेतल्याने आधीच विलंब झालेला हा प्रकल्प येनकेनप्रकारे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वाहनतळाची निर्मिती करताना मैदानाचे क्षेत्रफळ पूर्वीपेक्षा कमी झाले असुन ठाणे महापालिकेने ठेकेदाराला ९० टक्के बिलदेखील अदा केल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात लवकरच महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती या नगरसेवकांनी दिली. ठाणे महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात गावदेवी मैदानात स्मार्ट सिटी अंतर्गत भूमिगत वाहनतळ उभारला आहे. गावदेवी मैदानाची व्याप्ती ५६९० चौरस मीटर एवढी आहे. त्यापैकी, ४३१० चौ. मी जागेवर वाहनतळाचे बांधकाम केले आहे. त्यात, १३० चारचाकी आणि १२० दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा आहे. जानेवारी २०१९ मध्ये काम सुरू झालेल्या या प्रकल्पाचा खर्च सुमारे ३० कोटी इतका आहे. दोन वर्षात पुर्ण होणारा हा प्रकल्प कोविड काळामुळे तब्बल चार वर्षे लांबल्याने ठाणेकर हक्काच्या मैदानापासुन वंचित राहिले आहेत. मध्यंतरी या प्रकल्पाची पाहणी करून आयुक्तांनी बांधकाम, रंगकाम, वाहनतळावरील फायर एक्झिट, अग्निशमन यंत्रणा,आप्तकालीन यंत्रणा, प्रवासी आणि वाहनांची लिफ्ट, वायूवीजन सुविधा याबाबत निर्देश देऊन ऑक्टोबर अखेरपर्यंत वाहनतळावरील मैदान नागरिकांना वापरण्यायोग्य उपलब्ध करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे मैदानाचे काम संथगतीने सुरु असल्याने भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक सुनेश जोशी,मृणाल पेंडसे आणि प्रतिभा मढवी यांनी मंगळवारी मैदानाची पाहणी केली. तसेच, मैदान पूर्ववत केल्यानंतरच वाहनतळ सुरु करण्याची मागणी केली आहे. या प्रकल्पामुळे मैदान पूर्वीपेक्षा छोटे झाले असुन ठेकेदाराला ९० टक्के बिलदेखील अदा करून झाले आहे. एकीकडे बजेट नाही म्हणता मग या ठेकेदाराला पेमेंट का केले.तेव्हा, प्रकल्पाला दिड वर्ष उशिर झाल्याने ठेकेदाराला दंड ठोठावण्यात यावा.दरम्यान, या परिसरातील भूमिगत वाहनतळासह तिन्ही पार्किग सुरु झाल्यानंतर वाहनांची भाऊगर्दी वाढणार असल्याने त्याबाबतचे काय नियोजन केले आहे.असा सवालही सुनेश जोशी यांनी केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading