सिग्नल तोडून पळणाऱ्या महिलेस अडवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास धडक मारून दुचाकीस्वार महिलेने धूम ठोकल्याचा प्रकार तीनहात नाका सिग्नलवर घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौपाडा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरज चौधरी यांनी तीनहात नाका सिग्नलवर एका दुचाकीस्वार महिलेला सिग्नलचा नियम मोडल्याने हटकले. तेव्हा महिलेने हुज्जत घालण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार ठाणे वाहतूक शाखेच्या उपायुक्त कार्यालयापासून काही मीटर अंतरावर सुरु होता. यानंतर निरज चौधरी हे वॉकीटॉकीच्या माध्यमातून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना बोलाविण्याचा प्रयत्न करत असतानाच महिलेने दुचाकी सुरू करून पोलीस अधिकाऱ्याला धडक देवून खाली पाडले. तसेच वेगात दुचाकी पळवून तिथून पळ काढला. या अपघातात निरज चौधरी यांच्या हाताच्या पंजाला दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस महिलेचा शोध घेत आहेत.
