हिरानंदानी इस्टेट येथील ३० एकरच्या भूखंडावर मलनिस्सारण प्रकल्पासह उद्यान विकसित केलं जाणार असल्याचा महापालिकेचा खुलासा

हिरानंदानी इस्टेट येथील ३० एकरच्या भूखंडावर मलनिस्सारण प्रकल्पासह उद्यान विकसित केलं जाणार असल्याचा खुलासा महापालिकेनं केला आहे. विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी काल ३० एकरचा भूखंड बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता. त्यावर महापालिकेनं हा खुलासा केला आहे. कोलशेत आणि कावेसर येथे रोमा बिल्डर्सच्या वतीनं ३० एकरच्या क्षेत्रावर मलनिस्सारण विल्हेवाट केंद्र आणि उद्यान उभारलं जाणार आहे. महापालिकेनं यासंदर्भात केलेली कार्यवाही ही राज्य शासनानं विशेष नगर वसाहतीसाठी दिलेल्या मंजुरीनुसारच करण्यात आल्याचा दावा महापालिकेनं केला आहे. शासनानं विशेष नगर वसाहतीच्या विकसनासाठी रोमा बिल्डर्सला स्थान निश्चित प्रमाणपत्र प्रदान केलं आहे. शासनाने विशेष नगर वसाहतीकरिता मंजूर केलेल्या अभिन्यास तसंच नियमावलीनुसार विशेष नगर वसाहतीचे विकसन करणं बंधनकारक आहे. रोमा बिल्डर्सच्या या विशेष नगर वसाहतीचे मंजूर अभिन्यासामध्ये शहराच्या मंजूर विकास योजनेनुसार मलनिस्सारण विल्हेवाट केंद्र आणि उद्यान विकसनाचे आरक्षण आहे. आणि महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या सल्ल्यानुसार हे करणं विकासकावर बंधनकारक आहे. विशेष नगर वसाहत प्रकल्पामधील मलनिस्सारण केंद्र आणि उद्यान हे केवळ त्याच प्रकल्पासाठी नसून त्या परिसरातील इतर क्षेत्रासाठीही आहे. हे आरक्षण मोठ्या स्वरूपात असून ते टप्प्याटप्प्यानं केलं जाणार आहे. मलनिस्सारण केंद्र आणि उद्यानाचे आरक्षण ३० एकर क्षेत्रावर असून तिचा नियोजित असलेल्या वापराकरिताच विकास केला जाणार आहे. मलनिस्सारण प्रकल्पासाठी आवश्यक असलेले क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रावर उद्यान विकासकाच्या माध्यमातून केलं जाणार असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading