मफतलाल जमिनीच्या तिस-या लिलावाची निविदा विनाविलंब प्रसिध्द करावी – संजय केळकर

मफतलाल जमिनीच्या तिस-या लिलावाची निविदा विनाविलंब प्रसिध्द करावी अन्यथा आपल्याला केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिका-यांकडे तक्रार करावी लागेल असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. मफतलालचे ऑफिशियल लिक्वीडेटर रमण्णा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी हा इशारा दिला. कळवा येथील मफतलाल कंपनीची १२३ एकर जमीन त्यांची हक्काची १५७ कोटी रूपयांची देणी द्यावीत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. या जमिनीची किंमत १ हजार १३२ कोटी रूपये ठरवण्यात आली आहे. न्यायालयानं यासंदर्भातला सिडकोचा दावा फेटाळण्यात आल्यानं जमिनीचा तिस-यांदा लिलाव करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १८ सप्टेंबरला हा निकाल झाला त्यानंतर ४२ दिवस उलटूनही निविदा प्रसिध्द न झाल्यामुळं कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मफतलाल कंपनी १९८९ मध्ये बंद पडली. त्यामुळं ३ हजार ३०० कामगार देशोधडीला लागले. याच काळात दीड हजार कामगारांचा मृत्यू झाला. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. यापूर्वी दोन वेळा निविदा प्रसिध्द झाल्या पण जमीन खरेदी करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. एखादा प्रभावशाली राजकारणी जमीन खरेदी करण्यासाठी कोणालाही पुढे येऊ देत नसावा असा कामगारांना संशय आहे. सिडकोला जमिनीबद्दल २८ वर्षांनी आलेली जाग, २ लिलावांच्या तारखांनंतर सिडकोनं मुंबई उच्च न्यायालयात त्यासाठी धाव घेणं अशा घडामोडींमुळे कामगारांचा संशय बळावला आहे. कामगारांना त्यांची थकीत देणी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं संजय केळकर यांनी यावर बोलताना सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading