ठाण्याच्या विकासात महत्वाची भर घालणा-या विविध महत्वकांक्षी प्रकल्पांना राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. कोस्टल रोड, श्रीनगर ते गायमुख फूट हिल रोड, शहरांतर्गत मेट्रो प्रकल्प, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पार्किंगसह अन्य सार्वजनिक सुविधा, नवीन ठाण्याचा विकास अशा विविध प्रकल्पांना तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. कोस्टलला तत्वत: मंजुरी देऊन त्याचा डीपीआर तयार करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत. गायमुख ते खारबाव या खाडी पूलाचं काम मुंबई महानगर रस्ते विकास प्राधिकरण करणार असून त्याचाही डीपी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठाण्यातील मध्यवर्ती कारागृह स्थलांतरीत करण्यासाठी अप्पर महानिरिक्षक तुरूंग यांची मंजुरी घेण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत. शहरांतर्गत मेट्रोचे डीपीआर मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत. कल्याण आणि वसई या जलवाहतुकीच्या साडेसहाशे कोटी रूपयांचा प्रकल्प आराखडा महापालिकेनं तयार केला असून त्यातील १०० कोटीच्या टप्प्याचे काम जेएनपीटीनं महापालिकेच्या सल्ल्याने त्वरीत सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या कळवा येथील अतिरिक्त जागेवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा प्रस्ताव सविस्तर आराखड्यासह मंजुरीसाठी परिवहन विभागाला पाठवण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या एसटी स्टँडच्या अतिरिक्त जागेवर पार्कींग आणि अन्य सार्वजनिक सुविधा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याच्याही मंजुरीचा प्रस्ताव परिवहन विभागाला पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डायघर येथील प्रस्तावित एज्युकेशन हबला लवकरच मंजुरी अपेक्षित असून दिवा-आगासन रस्त्याचा डीपीआर सादर करण्याचे आदेश मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. तलावपाळी परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभाग, झेडपी, महापालिका यांच्या जुन्या वास्तूंचा पुनर्विकास करून पार्कींग सुविधेसह संयुक्त संकुल उभारण्यासाठीही या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
