७ पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात एका दिवसात ४० बंधारे

सात पथकांच्या माध्यमातून अधिकारी-लोकप्रतिनिधींनी एका दिवसात ४० बंधारे बांधले. यंदाच्या ओल्या दुष्काळामुळे शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेले पीक अवकाळीनं वाहून नेले. येणा-या रब्बी हंगामातील पिक तरी शेतक-यांसाठी आधार ठरावं म्हणून जिल्हा परिषदेच्या अधिकारी-लोकप्रतिनिधींनी केवळ पाहणी दौरे न करता मुरबाडमध्ये प्रत्यक्ष वनराई बंधारे बांधत शेतक-यांना संकटात आधार देण्याचा प्रयत्न केला. मुरबाड येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचा-यांची विविध सात पथकं तयार केली. या पथकांनी शिक्षक, विद्यार्थी, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामस्थ यांच्या माध्यमातून दिवसभरात ४० बंधारे बांधले. वनराई बंधारा मोहिम याअंतर्गत साडेचार हजार वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. अवकाळी पावसामुळे खरीप हंगामात शेतक-यांचं मोठं नुकसान झालं. आता सुरू असलेल्या रब्बी हंगामात शेतकरी भाजीपाल्याची लागवड करत असून यासाठी हे वनराई बंधारे उपयुक्त ठरत आहेत. वनराई बंधा-याच्या माध्यमातून साठवलेल्या पाण्यातून दीड ते दोन महिने भाजीपाला घेणं शक्य होणार असून काही ठिकाणी गावकरी बंधा-याच्या पाण्यावर हरभरा, मूग, वाल, उडीद तसंच भाजीपाल्यामध्ये भेंडी, मिरची अशा पीकांची लागवड करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading