मोदी सरकार इस्त्रायलच्या मदतीनं भारतात हेरगिरी करत असल्याचा आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप

मोदी सरकार इस्त्रायलच्या मदतीनं भारतीय नागरिकांची हेरगिरी करत असल्याचा आरोप करून या विरोधात लढा उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. भारतातले अनेक विचारवंत, शिक्षणतज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांच्या खाजगी आयुष्यावर पाळत ठेवली जात आहे. हे काम इस्त्रायलच्या एनएसओ समूहानं भारत सरकारच्या परवानगीनेच सुरू केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. ही हेरगिरी खपवून घेतली जाणार नाही. या विरोधात लढा उभारण्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. भारतातले अनेक विचारवंत, शिक्षणतज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या फोनमधले व्हॉटस् ॲप मेसेज मे २०१९ पर्यंत त्यांच्या नकळत वाचले जात होते असा खळबळजनक दावा व्हॉटस् ॲपने इस्त्रायलच्या एनएसओ समूहावर कॅलिफोर्नियात दाखल केलेल्या दाव्यामध्ये केला आहे. एनएसओ ही कंपनी पीगेसस नावाचं एक सॉफ्टवेअर बनवतं आणि मोबाईल धारकाच्या नकळत स्मार्ट फोनमध्ये ते चलाखीनं पेरतं. एक्सप्लॉईंट लिंक या नावाचा पर्याय जर तुम्ही नकळत क्लीक केलात तर पिगेसस तुमच्या मोबाईलमध्ये प्रवेश करतं. त्यानंतर व्हॉटस् ॲपने कितीही सुरक्षिततेचे उपाय योजले तरीही तुमचे मेसेज पिगेसस वाचू शकतं हे या दाव्यामुळे उघडकीस आलं आहे. सामान्य माणसं आणि कार्यकर्त्यांवरील हेरगिरी सहन केली जाणार नाही असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading