भिवंडी महानगरपालिकेतील जाँबाज अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समय सुचकता दाखवली नसती तर आज मृतांचा आकडा शेकडाच्या घरात असता.

भिवंडीतील पिराणीपाडा परिसरात एक चार मजल्याची इमारत काल कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. भिवंडी महानगरपालिकेतील जाँबाज अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समय सुचकता दाखवली नसती तर आज मृतांचा आकडा शेकडाच्या घरात असता. मात्र, या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक करणे तर दूरच राहिले. उलट अनधिकृत इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला. भिवंडी शहरात अनधिकृत इमारती शेकडोच्या घरात आहेत. या इमारती कशा उभ्या राहिल्या, याला कोणाचा आशिर्वाद आहे हे सर्वजण जाणून आहेत. यास पालिकेचे अधिकारी जितके जबाबदार आहेत, त्याहीपेक्षा जास्त जबाबदार राजकीय हस्तक आहेत. त्यांच्या मंजुरी शिवाय हे शक्यच नाही. मात्र, प्रशासकीय कागदोपत्री प्रभाग अाधिकारी, बिट निरीक्षक, वसुली लिपिक, शहानिशा अधिकारी यांनाच जबाबदार धरले जाते. कारण, रेकाॅर्डवर त्यांचे शेरे, टिप्पणी आणि स्वाक्षरी असतात. एखादी अनधिकृत इमारत कोसळली की, प्रथम अधिकाऱ्यांचेच धाबे दणाणतात. कारण, निलंबनाची टांगती तलवार त्यांच्या मानेवर असते. नियमानुसार इमारत अधिकृत असो अथवा अनधिकृत ती धोकादायक असल्यास तेथील रहिवाशांना नोटीस दिलीच जाते. यातून कोणीही सुटलेले नाही. परंतु, आपल्या आयुष्याची जमापुंजी लावून ज्यांनी फ्लॅट विकत घेतले आहे, ते घर सोडून कसे आणि कुठे जाणार? म्हणूनच मेलो तरी बेहत्तर पण, इथेच राहणार अशी भूमिका धोकादायक इमारतीतील रहिवाशी घेत असतात. काल जी दुर्घटना घडली त्यामध्ये जाँबाज कर्मचाऱ्यांनी साक्षात मृत्यू समोर पाहिला. अवघ्या १० सेंकदाच्या फरकाने अनेकांचे प्राण वाचले. पण, तत्पूर्वी आपले जीव धोक्यात घालून त्यांनी शेकडो लोकांचे प्राण वाचविले. रात्री ९ वाजता आपत्कालीन विभागाला खबर मिळताच प्रभाग अधिकारी सुनिल भोईर, ईश्वर आडेप, शरद भवार, सुदेश जाधव, महेंद्र मोहिते, आतिष जाधव, म्हात्रे अाणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी इमारतीच्या काॅलमला चिरा पडत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीस पडले. लागलीच सगळ्यांनी चार मजल्यावरील ३२ फ्लॅट मधल्या रहिवाशांना तात्काळ बाहेर पडण्यास सांगितले. इमारत कोणत्याही क्षणी कोसळणार हे माहित असूनही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता चार मजल्यावर जाऊन लोकांना जबरदस्तीने बाहेर काढले. मध्यरात्री दिड वाजेपर्यंत जवळपास सर्वांना इमारतीच्या बाहेर काढून आसपासचा इलाका ही खाली केला. इमारतीमध्ये कोणी नाही ना? हे पाहण्यासाठी गेलेले काही कर्मचारी पहिल्या मजल्यावरून उतरत असतानाच इमारतीच्या पाय-या फाटत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ते धावत बाहेर येत असतानाच इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. आणि धुराच्या लोटातून कर्मचारी कसेबसे बाहेर आले. साक्षात मृत्यू समोर असल्याचे कर्मचाऱ्यांनी पाहिले. या जाँबाज अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवली नसती तर आज मृतांचे खच पडले असते. आकडा शेकड्यांनी वाढला असता. जे दोन रहिवाशी मृत्यू पावले. ते कर्मचाऱ्यांची नजर चुकवून बाईक काढण्यासाठी गेले होते. इमारत आत्ताच कोसळणारा आहे हे माहीत असूनही आपला जीव धोक्यात घालून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही. तरीही कर्मचाऱ्यांच्या नावाने लोकं बोटे मोडतच असतात. आपत्कालीन यंत्रणाच्या नावाने बोंब मारणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे. जाँबाज कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून शेकडो लोकांचे प्राण वाचविले म्हणून पालिका प्रशासनाने त्यांना एक वेतनश्रेणी वाढवून त्यांचा गौरव करावा अशी मागणी शिवसेना प्रणित अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियनन केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading