विहंग, रा.फ. नाईक संघाने उंचावला जे.पी. स्मृतीचषक

विहंग क्रीडा मंडळ आणि रा. फ. नाईक विद्यालयाने अंतिम लढतीत सहज विजय मिळवत दि युनायटेड स्पोर्टस क्लबने दत्तजयंती उत्सवानिमित्ताने आयोजित केलेल्या जनार्दन पांडुरंग कोळी तथा जे.पी कोळी स्मृती ठाणे जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत अनुक्रमे किशोर आणि किशोरी गटाचे विजेतेपद मिळवले.
किशोर गटाच्या अंतिम सामन्यात विहंग क्रीडा मंडळाने फादर एग्नेल संघाचा ९-६ असा एक डाव ३ गुणांनी धुव्वा उडवला. सामन्याच्या पहिल्या डावापासून खेळाची सूत्रे आपल्या हाती ठेवताना विहंगने पहिल्या डावात ९-२ अशी भक्कम आघाडी घेतली होती. फॉलोऑन मिळाल्यावर देखील फादर एग्नेल संघाला सात गुणांची पिछाडी भरुन काढता आली नाही. संघाला विजेतेपद मिळवून देताना करणं गुप्ताने संरक्षणात अनुक्रमे २.५० आणि १.३० मिनिटे पळतीचा खेळ करत आक्रमणात ३ गडी बाद केले. ओंकार सावंतने अनुक्रमे २.५० आणि २.२० मिनिटे पळतीचा खेळ केला.याशिवाय आक्रमणात दोन गुण मिळवत करणला चांगली साथ दिली. पराभुत संघाच्या विनायक भणगे, वेदांत शिवले, आयुष नरे आणि गणेश बिराजदारने बऱ्यापैकी खेळ केला.
मुलींच्या अंतिम लढतीत रा.फ.नाईक विद्यालयाने ज्ञानविकास फाऊंडेशनचे आव्हान २०-१५ असे परतवून लावले. सामन्याच्या पूर्वार्धात रा.फ.नाईक विद्यालयाने १०-७ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावातही विजेत्या संघाने १० गुण नोंदवत चांगले आव्हान प्रतिस्पर्ध्यांसमोर उभे केले होते. पण या आव्हानाची पूर्तता करण्यात ज्ञानविकास संघ अपयशी ठरला. जेत्यांच्या अदिती कोंढाळकरने आक्रमणात ४ गुण मिळवून १.५०मिनिटे पळतीचा खेळ केला. पराभुत संघाचा बचाव भेदताना वैष्णवी जाधवने ६ गुण मिळवत १.५० मिनिटे संरक्षण केले. अदिती दौंडकरने ३ गुण आणि १.१० मिनिटे संरक्षण केले. ज्ञानविकास फाऊंडेशनच्या प्राची वांगडे आणि स्वरा साळुंखेने अष्टपैलू खेळ करत पराभव टाळण्यासाठी लढत दिली.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू –
संरक्षक – प्रणिती जगदाळे (रा. फ.नाईक विद्यालय), ओंकार सावंत (विहंग क्रीडा मंडळ)
आक्रमक – स्वरा साळुंखे ( ज्ञानविकास फाऊंडेशन), वेद सकपाळ ( फादर एग्नेल)
अष्टपैलू – वैष्णवी जाधव ( रा.फ.नाईक विद्यालय), करण गुप्ता ( विहंग क्रीडा मंडळ)

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading