​विद्या प्रसारक मंडळाच्या क्रीडा प्रबोधिनीचा येत्या सोमवारपासून प्रारंभ

विद्या प्रसारक मंडळातर्फे सोमवारपासून क्रीडा प्रबोधिनी सुरू केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळांचे खूप महत्त्व आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने दिवसातून थोडा वेळ काढून खेळायला हवे. खेळ खेळल्याने तंदुरुस्ती सोबत मनोरंजनही होते. बाहेर कोणत्याही प्रकारचा मैदानी खेळ असो तो आपल्या शरीराला स्वस्थ आणि मनाला प्रसन्न करतो. खेळामुळे आपला व्यक्तिमत्त्व विकास होण्यास निश्चितच मदत होते. ठाण्यासारख्या महानगरांमध्ये मैदानाचा अभाव आणि शिक्षणातील अनावश्यक स्पर्धा यामुळे पालक आणि विद्यार्थीही मैदानी खेळांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य डॉ. महेश बेडेकर स्वतः आंतरराष्ट्रीय दर्जाचे धावपटू असल्याने त्यांनी खेळांचे महत्त्व जाणून विद्या प्रसारक मंडळाच्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी striders या फिटनेस प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या संस्थेची मदत घेण्याचे ठरवले आहे . शारीरिक शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास आणि त्यापुढे विविध स्पर्धात्मक खेळांचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याची योजना या प्रबोधिनीच्या माध्यमातून डॉ.महेश बेडेकर यांनी हाती घेतली आहे. या क्रीडा प्रबोधिनीचे उद्घाटन येत्या सोमवारी आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर-भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading