​पांचपाखाडीतल्या चाळींतील साडेचारशे कुटुंबियांचं हक्काच्या घराचं स्वप्न तब्बल २० वर्षानंतर साकार

पांचपाखाडीतल्या चाळींत दहा बाय दहाच्या खोल्यांमध्ये वास्तव्याला असलेल्या जवळपास ४५० कुटुंबांनी हक्काच्या, पक्क्या आणि मोठ्या घरांमध्ये वास्तव्याचे स्वप्न १९९७ साली पाहीले होते. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतून या कुटुंबांसाठी इमारती उभारण्याचा निर्णयही झाला. अनेक वर्षानंतर हे स्वप्न आता साकार झाले आहे. गेल्या दोन तपांमध्ये या स्वप्नामध्ये अनंत अडचणी उभ्या ठाकल्या. मात्र जयेंद्र गाला यांच्या कुटुंबियांमुळे हे स्वप्न साकार झाले आहे. गेली अनेक वर्ष विस्थापितांसारखे भाड्याच्या खोल्यांमध्ये वास्तव्य करणारी ही कुटुंबे आता ‘आनंद सावली’ या २४ मजली सूसज्ज टॉवर्समध्ये सुखावली आहेत. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या मागील बाजूस अनेक चाळी होत्या. छोट्या छोट्या घरांमध्ये वास्तव्य करणाऱ्या या कुटुंबांना झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत हक्काचे पक्के घर देण्याचे स्वप्न आनंद दिघे यांनी दाखवले होते. त्यामुळेच या प्रस्तावित योजनेचे ‘आनंद सावली’ असे नामकरण करण्यात आले. योजनेसाठी जुळवाजुळव सुरू झाली. २०११ नंतर इथल्या ४५० कुटुंबांचे स्थलांतर करून त्यांच्या चाळी पाडण्यात आल्या. दोन वर्षांत नव्या इमारतीमध्ये घरे मिळतील अशी या कुटुंबांची आशा होती. परंतु निर्माण झालेल्या अनेक अडथळ्यांमुळे हा प्रकल्प रखडला. हा प्रकल्प पूर्ण करण्याची तळमळ असलेल्या जयेंद्र गाला यांचेही मध्यंतरी आकस्मिक निधन झाले. त्यामुळे स्थलांतरीत झालेली कुटुंब अक्षरशः हवालदिल झाली होती. कोरोना संक्रमणाच्या काळात निर्माण झालेल्या आर्थिक चणचणीमुळे चार महिन्यांचे भाडे देणे विकासकांना शक्य नव्हते. त्यामुळे अनेक कुटुंबांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला होता. मात्र, गाला कुटुंबीयांनी या प्रकल्पातले सर्व अडथळे नेटाने दूर केले. प्रचंड आर्थिक गुंतवणूक असलेला हा प्रकल्प आपल्या भागिदारांकडून स्वतःच्या खांद्यावर घेतला. त्यानंतर दोन वर्षांच्या विक्रमी काळात २४ मजल्यांचे दोन टॉवर्स उभे करून ४५० चाळकऱ्यांसह पालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या ५५० पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे आणि प्रशस्त घर उपलब्ध करून दिले आहे. दोन दिवसांपूर्वी विकासक आणि एसआरए प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कुटुंबांना आपल्या मालकीच्या घरांच्या चाव्या वाटपाचा हृद्य सोहळा संपन्न झाला. विस्थापितांच्या जवळपास १० वर्षांच्या भाड्याचा भार उचलून प्रकल्प पूर्ण करण्याचे हे दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading