३७५ मद्यपी वाहनचालक आणि १८१ सहप्रवाशांवर वाहतूक पोलीसांची कारवाई

मद्य प्राशन करून वाहन चालविणा-यांच्या विरोधातील ठाणे वाहतूक पोलिसांची कारवाई अधिक तीव्र झाली असून काल रात्री ३७५ मद्यपी वाहनचालकांसह त्यांच्यासोबत प्रवास करणा-या १८१ जणांवरही पोलिसांनी कारवाई केली. या ५५६ जणांकडून न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येकी दोन हजार रुपये दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
कोरोना संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून वाहतूक पोलीस मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करत नव्हते. मात्र, मद्य प्राशन करून वाहन चालविल्यामुळे अपघातांची संख्या वाढण्याची भीती असल्याने २५ डिसेंबरपासून वाहतूक पोलिसांनी ही कारवाई पुन्हा सुरू केली आहे. वाहनचालकांची सुरक्षित पद्धतीने तपासणी व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दित ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची कसून तपासणी सुरू झाली आहे. गेल्या सहा दिवसांत ६०० पेक्षा जास्त मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली आहे. मद्यपी वाहन चालकासोबत प्रवास करणे हा सुध्दा गुन्हा असून काल रात्रीपासून अशा सहप्रवाशांवरही कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मंगळवारी रात्री नाकाबंदी मोहिमेदरम्यान ३७५ जण मद्य प्राशन करून वाहनच चालवताना सापडले आहेत. त्यांच्यासोबत प्रवास करणा-या १८१ जणांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढेही अधिक तीव्र होणार असून कुणीही मद्य प्राशन करून वाहन चालवू नये किंवा मद्यपी वाहनचालकासोबत प्रवास करू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दित वाहतूक शाखेचे १८ विभाग असून त्यापैकी कासरवडवलीच्या हद्दित सर्वाधिक ५१ मद्यपी वाहनचालक आणि २८ सहप्रवासी सापडले आहेत. त्या खालोखाल वागळे कापुरबावडी, भिवंडी या विभागांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी म्हणजेच ९ मद्यपी वाहनचालक आणि तीन सहप्रवासी ठाणे नगर विभागात सापडले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading