२६ डिसेंबर रोजी होणारं सूर्यग्रहण भारतातून कंकणाकृती स्थितीत दिसणार – दा. कृ. सोमण

या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण येत्या गुरूवारी म्हणजे २६ डिसेंबर रोजी होत असून भारतातून हे सूर्यग्रहण कंकणाकृती
स्थितीत दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी जर चंद्र
पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. त्यामुळं जरी चंद्रबिंब सूर्यबिंबाच्या आड आले
तरी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसत राहते याला फायर रिंग म्हणजे कंकणाकृती सूर्यग्रहण असं म्हणतात. यावेळी अशी
कंकणाकृती अवस्था देशाच्या विविध भागातून सकाळी सुमारे २ ते ३ मिनिटं दिसणार आहे. खग्रास सूर्यग्रहणात छाया
प्रकाश लहरी, डायमंड रिंग, करोना, दिवसा काळोख झाल्यामुळे होणारे ग्रह तारका दर्शन जसे होते तसे आविष्कार
कंकणाकृती सूर्यग्रहणात दिसत नाहीत मात्र फायर रिंगचे अद्भूत दर्शन होते असं सोमण यांनी सांगितलं. यापूर्वी १५ जानेवारी
२०१० ला सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातून दिसली होती. आता पुढल्या वर्षी २१ जून २०२० मध्ये होणा-या
सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती देशाच्या विविध भागातून पाहता येणार असल्याचं सोमण यांनी सांगितलं. सूर्यग्रहण हे
साध्या डोळ्यांनी पाहू नये. सूर्यग्रहण चष्म्यातूनच पहावं असंही आवाहन सोमण यांनी केलं आहे. २६ डिसेंबरला मुंबईतून
सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. ग्रहणमध्य सकाळी ९ वाजून ३२ मिनिटांनी होईल. त्यावेळी
जास्तीतजास्त सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकलेले दिसेल. सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल असंही
सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading