होळी पौर्णिमेच्या रात्री होणार सुपरमूनचं दर्शन

बुधवारच्या होळी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्यानं सुपरमूनचं दर्शन होणार आहे. ही माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येत असेल तर चंद्रबिंब १४ टक्के मोठे आणि ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. बुधवार २० मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या ३ लाख ५९ हजार ३७७ किलोमीटर अंतरावर येणार आहे. बुधवार २० मार्च होळी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सायंकाळी ७ वाजून १३ मिनिटांनी पूर्व क्षितीजावर उगवून रात्रभर आकाशात दर्शन देऊन गुरूवारी सकाळी ७ वाजून १ मिनिटांनी पश्चिमेस मावळणार आहे. यावर्षीचा हे अखेरचं सुपरमूनचं दर्शन असल्याचं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. यापूर्वी १९ मार्च २०११ ला होळी पौर्णिमा आणि सुपरमून असा योग आला होता. आता यानंतर पुन्हा ९ वर्षांनी १० मार्च २०२८ ला पुन्हा होळी पौर्णिमा आणि सुपरमूनचं दर्शन असा योग येणार असल्याचंही दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. बुधवार २० मार्च रोजी होळी पौर्णिमा, सुपरमून दर्शन आणि विषुवदिन असा तिहेरी योग आल्याचंही दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. बुधवार २० मार्च रोजी उत्तररात्री ३ वाजून २८ मिनिटांनी सूर्य सायन मेष राशीत प्रवेश करणार आहे. या दिवशी सूर्य विषुववृत्तावर येणार असल्यानं सर्वत्र दिन आणि रात्रीमान समान असणार आहे. नंतर सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करेल या दिवसाला विषुवदिन असं म्हणतात असंही खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading