स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाण्यात विविध उपक्रमांचे आयोजन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ठाणे शहरात ठाणे महापालिका आणि विविध सामाजिक संस्थेच्या विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा,वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा, चित्र प्रदर्शन, नृत्य, बाईक रॅली, मॅरेथॉन अशा विविधांगी ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव” साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आज महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ आणि स्वराज्य महोत्सव अभियान शहरात राबविण्यात येणार आहे. यानिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्थेच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या सर्व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यावेळी आयुक्तांनी ही माहिती दिली. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक यांच्या आठवणी तसेच देशभक्तीची भावना जनमानसात कायम राहावी उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमात शहरातील सर्व नागरिकांना सहभागी होता यावे यासाठी शहरातील विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ठाणे शहरातील विविध सामाजिक संस्था यात सहभागी होत असल्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले. यावेळी सामाजिक संस्थांनी तयार केलेल्या ‘उत्सव 75’ या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यामध्ये हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण करणे, स्वातंत्र्यदिनी प्रभात फेरीचे आयोजन करणे, एन.सी.सी.,एन.एस.एस.कॅडेटचे संचलन करणे, सायक्लोथॉन / मॅरेथॉनचे आयोजन करणे, शालेय, महाविद्यालय स्तरावर निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करणे, स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत चित्रांचे प्रदर्शन भरविणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 12 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमास ठाणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त विपिन शर्मा आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

 

 

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading