स्वाईन फ्लूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने स्वाईन फ्लूची चाचणी महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांवर विनामूल्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या चाचणीसाठी संबंधित डॉक्टरांची लेखी शिफारस लागेल अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिली आहे. जुलैमधील पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढत आहे. महिनाभरात स्वाईन फ्लूचे 20 रुग्ण आढळले. त्यापैकी 15 जण बरे झाले आहेत. 2 जणांचे निधन झाले. आतापर्यंत रुग्ण सापडलेल्या परिसरातील हजारो घरांचे सर्वेक्षण आरोग्य विभागामार्फत करण्यात आले. त्यात नवीन रुग्ण आढळलेले नाहीत.
ताप, कोरडा खोकला, घशात खवखव, भूक मंदावणे, डोके दुखणे ही स्वाईन फ्लू ची लक्षणे असून ती जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच, कोविड काळाप्रमाणेच मास्क वापरणे, गर्दीत जाणे टाळणे ही पथ्ये पाळावीत, असेही आवाहन महापालिकेने केले आहे.