स्वयंपूर्ण ऑक्सिजन निर्मितीकडे ठाणे महापालिकेची वाटचाल

शहरात ऑक्सिजनच्या मर्यादित पुरवठ्यामुळे रूग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने स्वयंपूर्ण ऑक्सिजन निर्मितीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली असून एफडीए प्रमाणित पहिल्या ऑक्सिजन प्रकल्पाचा शुभारंभ आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. प्रतिदिन ३.२ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प आजपासून कार्यान्वित करण्यात आले असून ६५० ऑक्सिजन बेडना लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती लवकरच करण्यात येणार आहे. महापालिकेच्या कोविड रूग्णालयांना तसेच खासगी कोविड रूग्णालयांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. इतर ठिकाणाहून उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजनचे योग्य वितरण करण्यासोबतच ठाणे महानगरपालिकेने स्वतःचे ऑक्सिजन प्रकल्प सुरु करण्यासाठी पीएसए तंत्रज्ञानावर आधारीत प्रकल्प उभे केले आहे. पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचा शुभारंभ आज करण्यात आला. प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेच्या या दोन प्रकल्पांमुळे ठाणे कोविड रूग्णालय आणि पार्किंग प्लाझा रूग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. अवघ्या १५ दिवसात युद्ध पातळीवर हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. पार्किंग प्लाझा मधील ३०० ऑक्सिजन बेडना या प्रकल्पाचा फायदा होणार असून अजून २१५ बेडना लागणारा ऑक्सिजनची निर्मिती देखील दुसऱ्या प्रकल्पमध्ये करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी रुग्णालयात देखील जवळपास ६५० बेडना लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात येणार असल्याचं पालकमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. शहरात ४ ऑक्सिजन प्रकल्प उभे करण्यात येणार असून या प्रकल्पामुळे राज्यातील पहिली स्वयंपूर्ण ऑक्सिजन निर्मिती करणारी महापालिका ठरणार आहे. एफडीए प्रमाणित पहिला ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये हवेतील ऑक्सीजन विशिष्ट पध्दतीने टाकीमध्ये साठवून सदर हवेतील अशुध्द घटक वेगळे करण्यात येतात. या ऑक्सीजनची शुध्दता ९३% आहे. या दोन्ही प्रकल्पांची उभारणी केल्यावर प्रती दिवस ३५० सिलेंडर इतका ऑक्सीजन निर्माण होणार आहे . एका ऑक्सीजन जनरेशन प्लॅण्टद्वारे ८५० लिटर प्रती मिनिट इतका ऑक्सीजन प्राप्त होणार आहे. प्रती दिवस दोन्ही प्लॅण्टद्वारा सुमारे ३.२ टन ऑक्सीजन मिळणे अपेक्षित आहे. साधारणत: १५० रुग्णांना १० लिटर प्रती मिनिट ऑक्सीजन पुरवठा करणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प हा अत्यंत कमी वेळात म्हणजेच १० दिवसात उभारण्यात आला असून, या प्रकल्पाद्वारे निर्माण केलेला ऑक्सीजन पाईप लाईनद्वारे रुग्णालयास पुरविण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेमार्फत उभारण्यात येणाऱ्या या ०२ ऑक्सीजन जनरेशन प्लॅण्टमध्ये वापरण्यात आलेले कॉम्प्रेसर हे जर्मन मेक आहेत. तसेच यामध्ये वापरण्यात आलेले ऑक्सीजन जनरेटर हे अमेरिकन मेक आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading