स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ मध्ये देशात महाराष्ट्राची सर्वोत्तम कामगिरी – एकनाथ शिंदे यांच्याकडून पुरस्कारप्राप्त शहरांचे अभिनंदन

स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ मध्ये महाराष्ट्राने देशात सर्वोत्तम कामगिरी केली असून नवी दिल्लीत झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात विटा, लोणावळा आणि सासवड देशात अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. सलग तीन पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या नगरपालिकांचे आणि विविध मानांकनांमध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या शहरांचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत स्वच्छता, शहराचा हागणदारी मुक्तीचा दर्जा, घनकचरा व्यवस्थापन, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज आदी घटकांचे केंद्र शासनाच्या त्रयस्थ संस्थेमार्फत व्यापक सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणात राज्यातील जनतेचा उत्स्फूर्त सहभाग मिळाल्यामुळे, स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये महाराष्ट्राने सर्वोत्तम कामगिरी केली त्याबद्दल राज्यातील जनतेचे आणि पुरस्कारप्राप्त नगरपालिकांचे शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. नवी दिल्लीमध्ये प्रदान झालेल्या पुरस्कारांमध्ये एकूण पुरस्कारांच्या ४० टक्के पुरस्कार हे महाराष्ट्राला आहेत, ही अतिशय अभिमानाची बाब असून वन स्टार मानांकनांमध्ये १४७ पैकी ५५ शहरे तर थ्री स्टार मानांकनांमध्ये १४३ पैकी ६४ शहरे आणि फाईव्ह स्टार मानांकनांमध्ये देशातील ९ शहरांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा समावेश झाला आहे, ही देखील महाराष्ट्राच्या दृष्टीने गौरवाची गोष्ट आहे. पुरस्कारप्राप्त शहरांचे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन करतानाच राज्यातील इतर सर्व शहरांनी पुढील काळात स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सक्रिय सहभागी होऊन उज्ज्वल कामगिरी करण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading