स्वच्छ सर्वेक्षण मध्ये ठाणे शहरास टॉप टेन मध्ये आणण्यासाठी संपूर्ण ताकदीने काम करावे महापालिका आयुक्तांचे निर्देश

शहरातील स्वच्छता ही स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेपुरती मर्यादित न राहता आपले शहर नियमित स्वच्छ राहिल यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असलेच पाहिजे. स्वच्छ सर्वेक्षण ही केवळ त्या विभागाचीच जबाबदारी समजली जाते परंतु शहर स्वच्छ ठेवणे हे महापालिकेतील प्रत्येक अधिकारी कर्मचा-यांचे कर्तव्य असून स्वच्छ शहर सर्वेक्षण 2023 मध्ये ठाणे शहराला ‘टॉप टेन’ मध्ये आणण्यासाठी सर्वांनी संपूर्ण ताकदीने काम करावे असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आज दिले. स्वच्छ सर्वेक्षण 2023 आणि शौचालय व्यवस्थापनाबाबत आढावा घेवून कामाचे नियोजन करण्यासंदर्भात आज बैठक आयोजित केली होती. त्यावेळी आयुक्तांनी हे निर्देश दिले. शहरातील सार्वजनिक शौचालयांची विदारक स्थिती बदलणे गरजेचे असून यासाठी कामाचे नियोजन करण्याच्या सूचना बांगर यांनी दिल्या. सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, यांनी आपापल्या प्रभागातील शौचालयाची पाहणी करुन धोकादायक, किरकोळ दुरूस्ती आवश्यक असणारी, मोठया प्रमाणावर आवश्यक असलेली दुरूस्तीची शौचालय असे शौचालयाचे वर्गीकरण करावे, शौचालयांमध्ये पाणी उपलब्ध असणे हे नागरिकांच्या सोईसाठी तसेच शौचालय स्वच्छ राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शौचालयामध्ये छतावरच्या टाकीद्वारे पाणी उपलबध असणे हे शौचालय स्वच्छ राहण्यासाठी तसेच नागरिकांच्या सोईसाठी अत्यंत आवश्यक आहे. तरी ज्या शौचालयांवर पाण्याच्या टाक्या नाहीत अशी शौचालये निश्चित करुन अशा शौचालयांवर पाण्याच्या टाक्या बसवून नळाद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. ज्या शौचालयांवर इमारतीची क्षमता नसल्यामुळे टाकी बसविणे शक्य नाही अशा शौचालयांवर जमिनीपासून लोखंडी अँगल उभारुन पाण्याच्या टाक्या बसवाव्यात, जर पाण्याचे कनेक्शन देणे शक्य नसेल तर बोअरवेल उपलब्ध करुन देण्यात यावी. सर्व शौचालयात दिव्यांग व्यक्तींना सहज प्रवेश करता येईल्‍ अशा पद्धतीने रॅम्प उपलब्ध करुन द्यावेत. ज्या ठिकाणी कडीकोयंडे तुटलेले असतील ते दुरूस्त करुन घ्या. सार्वजनिक शौचालयांसाठी दिशादर्शक फलक अत्यंत महत्वाचे असून त्यांची उपलब्धतता करण्याबरोबरच भिंतींवर सूचना दर्शक फलक असावेत. या सर्व बाबी आठवडाभरात तपासून येत्या दोन ते तीप महिन्यात कार्यवाही करावी असेही आयुक्तांनी नमूद केले. स्वच्छ शौचालये ही ओळख निर्माण व्हावी यासाठी ठाण्यातील महापालिकेव्यतिरिक्त इतर सर्व सरकारी कार्यालयांमधील शौचालये स्वच्छ ठेवणेबाबत त्यांना कळवून त्याबाबत पाठपुरावा करावा, जर सरकारी कार्यालयांना काही मदत हवी असेल तर ती महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी. झोपडपट्टी विभाग ज्या ठिकाणी जागेअभावी जेथे शौचालय उभारणे शक्य नाही तसेच तीन हात नाका परिसर, वाणिज्य विभाग, गर्दीची ठिकाणे आणि ज्या ठिकाणी बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी कंटेनर शौचालय उपलब्ध करुन द्यावेत. शौचालयांची स्वच्छता करताना शहर स्वच्छ असणे देखील महत्वाचे आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा दिसणार नाही यासाठी सुक्ष्मस्तरावर नियोजन करुन अंमलबजावणी करावी. रेल्वे स्टेशन परिसरात फार मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा उपद्रव होत असून संपूर्ण परिसर फेरीवाला मुक्त असावा हे सुनिश्चित करावे. परिसरातील स्वच्छतेबरोबर वाणिज्य आस्थापना, इमारती यांच्या पाठीमागचे आवारही स्वच्छ असणे आवश्यक आहे. रस्त्यावर 50 मीटर अंतरावर ओला कचरा सुका कचरा अशा दोन कचराकुंड्या असल्या पाहिजे. घंटागाडी दररोज घरोघरी एकवेळ तरी पोहोचलीच पाहिजे याप्रमाणे नियोजन करावे. परिसर स्वच्छतेमध्ये कचरा न दिसण्याबरोबरच रस्त्यावर वाहते पाणी राहणार नाही अशा बाबींचीही काळजी घ्यावी. वाणिज्य भागातील सफाई, भाजी मार्केट परिसरातील रस्त्यांची सफाई दोन वेळा करणे आवश्यक आहे. जर रात्री झालेली असेल तर सकाळी कचरा दिसणार नाही ही कार्यवाही नियमित सुरू राहिले तर लोकांची मानसिकता निश्चितच बदलेल असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला. शहरातील सर्व नाले हे एकमेकांना जोडलेले असून प्रत्येक नाल्याला कलव्हर्ट असल्यामुळे त्या ठिकाणी संरक्षक जाळी बसविण्यात यावी. जेणेकरुन जाळीवर अडकलेला कचरा काढल्यास नाल्यात कचरा आढळून येणार नाही. नाले तसेच शहरातील तलावामधील पाण्यावर कचरा तरंगणार नाही याचीही दक्षता घेण्यात यावी. लग्नसमारंभ कार्यालये, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, हॉस्टेल्स अशा ठिकाणी दररोज 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो, अशा आस्थापनांना बल्क वेस्ट जनरेटर म्हणून संबोधले जाते. अशा आस्थापनांनी आपल्या परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट त्याच परिसरात लावणे अपेक्षित आहे. बल्क वेस्ट जनरेटरचा कचरा महानगरपालिकेद्वारे वहन करणे अपेक्षित नाही, त्याची विल्हेवाट त्यांनी लावण्याबाबत त्यांना सूचना देण्यात याव्यात. जर त्यांच्याकडून अशी कार्यवाही होत नसेल तर त्यांच्यावर मोठया प्रमाणावर दंडाची कारवाई करण्याच्या सूचनाही बांगर यांनी दिल्या. स्वच्छता ही महानगरपालिका तसेच नागरिक या दोघांचीही जबाबदारी आहे. ही जबाबदारी महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांनी आपली कर्तव्ये संपूर्ण कार्यक्षमतेने पार पाडण्यापासून सुरूवात केली पाहिजे. कचरा टाकल्याबद्दल दंड लावण्यापूर्वी महानगरपालिकेने आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडावी आणि त्यानंतर नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा ठेवणे आवश्यक आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading