स्वच्छतेबाबत सहाय्यक आयुक्तांनी सतर्क राहण्याचा महापालिका आयुक्तांचा इशारा

शहरातील स्वच्छता हा अतिशय महत्वाचा विषय असून सर्व प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांनी याबाबत सतर्क राहण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांच्या बैठकीत दिला. दोन तीन दिवसानंतर कोणत्याही प्रभागाचा पाहणी दौरा करून स्वच्छता कशी आहे याची पाहणी करणार असल्याचे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. काल सकाळी अचानक दोन-तीन प्रभाग समितीची पाहणी करून काही ठिकाणच्या कचऱ्याबाबत असमाधान व्यक्त करत आयुक्तांनी तातडीने सर्व सहाय्यक आयुक्तांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी स्वच्छतेबाबत कुठलीही सबब ऐकून घेतली जाणार नाही असे सांगून सर्व सहाय्यक आयुक्तांनी येत्या तीन दिवसांत आपला प्रभाग स्वच्छ राहिल याची दक्षता घ्यावी असे सांगितले.
महापालिकेचे विविध कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत ठेवू नका. त्यांना मदत करा अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ज्या मालमत्ता धारकांना मालमत्ता कर धनादेशद्वारे भरायचा आहे त्यांच्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत चेक ड्रॅाप बॅाक्स बसविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी आपल्या मालमत्ता कराचा भरणा मालमत्ता कराच्या देयकाची झेरॅाक्स कॅापी, आपले नाव, संपर्क क्रमांक, ग्राहक क्रमांक आदी तपशीलासह आपला चेक ड्रॅाप बॅाक्समध्ये टाकल्यास दुसऱ्या दिवशी त्यांना त्याची पावती देण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या.
राज्य शासनाच्या सुचनांनुसार सायंकाळी सातपर्यत सर्व आस्थापना सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. तरीही काही आस्थापना सात नंतरही सुरू राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे सातनंतर ज्या आस्थापना उघड्या आहेत अशा आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. याबाबत सर्व सहाय्यक आयुक्तांनी रोज सायंकाळी सात ते साडे सात या कालावधीत आपल्या प्रभागामध्ये फिरून सात नंतर सुरू असणाऱ्या तसेच ज्या ठिकाणी गर्दी होते अशा आस्थापना, अन्न पदार्थाचे स्टॅाल्सवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
तसंच नागरिकांनी मास्कचा वापर करावा यासाठी जास्तीत जास्त जनजागृती करावी तसेच नागरिकांनी मास्कचा वापर करण्याची सक्ती करावी. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी असे आदेशही महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading