सेंट्रल कोविड वॉर रुमची पाहणी करून महापौरांनी केलं अधिकारी-कर्मचा-यांचं कौतुक

दिवसभर खणखणणारा फोन… फोन उचलताच मी कोविड बाधित आहे….मला रुग्णालयात जायचे आहे.. असे समजताच तात्काळ त्या रुग्णांना दिलासा देवून त्यांना रुग्णवाहिकेची सोय करुन रुग्णाला संबंधित रुग्णालयात दाखल करण्याचे काम गेल्या वर्षभरापासून ठाणे महापालिकेच्या अद्ययावत अशा सेंट्रल कोविड वॉर रुमच्या माध्यमातून केले जात आहे. एकही दिवस बंद नसलेला हा वॉर रुम अत्यंत चांगल्या पध्दतीने 24 तास कोविडबाधित रुग्णांसाठी कार्यरत आहे, या वॉर रुमची पाहणी महापौर नरेश म्हस्के यांनी केली आणि या ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत वाढत असलेल्या कोविड 19 चा सामना करण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे अशा सूचना दिल्या. कोविड च्या काळात कोरोनाबाधित रुग्णांना तात्काळ माहिती उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने मागील वर्षी अद्ययावत असा मध्यवर्ती कोविड वॉर रुम महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्व‍ित केला आहे. या वॉररुमच्या माध्यमातून गेले वर्षभर कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातील बेडची उपलब्धता याबाबत तात्काळ माहिती उपलब्ध होवून त्यांना आवश्यक ती मदत दिली जात होती. अत्यंत चांगल्या पध्दतीचे काम 24 तास या सेंट्रल वॉर रुमच्या माध्यमातून होत असल्याबद्दल महापालिका प्रशासनाचे कौतुक महापौरांनी केले आहे. कोरोनाबाधित होणाऱ्या रुग्णांना आपण कुठे जायचे, कोणते औषधोपचार घ्यायचे, कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत, याबाबत संभ्रम निर्माण होत होता, यासाठी महापालिकेने सेंट्रल कोविड वॉर रुमची उभारणी हाजुरी येथे अत्यंत कमी कालावधीत केली. या ठिकाणी 24 तास चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उपलब्ध होणारी माहिती अद्ययावत करण्यासाठी 15 ते 20 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वॉर रुमच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांची माहिती क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर रुग्णास कोणत्या प्रकारच्या उपचारांची तसेच रुग्णालयातील बेडची उपलब्धतता पाहून त्यांना योग्य व्यवस्था पुरविण्याचे काम करण्यात येत आहे. रुग्णालयात दाखल करण्याच्या वेळेनुसार रुग्णाला रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली जात असल्याने अत्यंत कमी वेळेत रुग्ण रुग्णालयात दाखल होवून त्याच्यावर उपचार होणेस मदत होत आहे. यासाठी कोविड गार्डची देखील नियुक्ती करण्यात आली आहे, त्या कोविड वॉररुमच्या माध्यमातून शासकीय तसेच खाजगी रुग्णालयातील बेडच्या उपलब्धतेबाबत माहिती उपलब्ध होत असल्यामुळे गंभीर रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यास मदत होत आहे. तसेच रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम देखील या वॉररुमच्या माध्यमातून केले जाते. तसेच जिल्हयातील रुग्णांना देखील खाजगी आणि शासकीय रुग्णालयातील बेड उपलब्धतेबाबत सहजरित्या माहिती उपलब्ध होत असल्यामुळे महापालिकेने सुरू केलेल्या वॉर रुमबाबत सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या वॉररुममध्ये गेले वर्षभरापासून डॉ. माधवी देवल या प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत तर डॉ. भरत कोलते, डॉ. गोविंद निगुडकर, डॉ. आशिष सिंग हे सहायक वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करीत आहे, तर वॉररुमच्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून डॉ. खुशबू टावरी या काम पाहत आहेत. या वॉररुमध्ये एकूण 10- दूरध्वनी नंबर कार्यान्वित केलेले आहेत. कोविड बाधितांनी 918657906796, 918657906797 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस गंभीर होत आहे, शासन किंवा महापालिका प्रशासन कडक निर्बंध करेल तेव्हाच आम्ही नियम पाळू असा पवित्रा न घेता नागरिकांनी आपली स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. आज ठाणे शहरात फिरणारे अनेक नागरिक हे विनामास्क फिरताना आढळून येत आहेत. गेले वर्षभर महापालिका प्रशासन कोविडचा सामना करीत आहे, या ठिकाणी काम करणारे अधिकारी कर्मचारी यांना देखील काम करताना स्वत:चा जीव सांभाळून काम करावे लागत आहे. सध्या वाढत असलेला कोरोनाचा प्रसार हा संपूर्ण कुटुंबालाच संक्रमित करणारा आहे, त्यामुळे नागरिकांनी निष्काळजीपणे न वागता महापालिकेने आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि स्वतसह आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन महापौरांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading