सूर्याभोवती खळे दिसणे हा नैसर्गिक आविष्कार असून त्याचा आणि वाईट गोष्ट घडण्याचा कोणताही संबंध नाही अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. काल सकाळी कोल्हापूर येथून सूर्याभोवती प्रकाशाचे मोठे तेजोवलय दिसले. यालाच खळे असे म्हणतात. कधी कधी आकाशात अति उंचावर विरळ ढग निर्माण होतात त्यामध्ये बर्फाचे असंख्य स्फटीक असतात. त्यांचा आकार षटकोनी असून अपवर्तन कोन ६० अंशाचा असतो. सूर्याचे किरण बर्फाच्या या स्फटिकातून जाऊ लागले की मूळ दिशेपासून २२ अंशाने विचलित होतात. हीच तेजोवलयाची कोनीय त्रिज्या असते. सूर्याभोवती २२ अंश कोनीय त्रिज्येचे प्रकाशाचे वर्तुळ निर्माण होते. काही लोक खळे दिसण्याला अशुभ मानतात पण त्यात काही तथ्य नाही असं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.