सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत महापालिकेच्या महिलाकर्मचाऱ्यांनी जल्लोषात साजरा केला जागतिक महिला

दिलावणी, फ्युजन, पारंपारिक सण-उत्सव, नाटक आणि एकापेक्षा एक बहारदार गाणी ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सादर करुन आजचा जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला. राम गणेश गडकरी रंगायतन येथे ठाणे महापालिकेत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपायुक्त वर्षा दिक्षीत, अनघा कदम, मीनल पालांडे समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे उपस्थित होते. महिलांना शुभेच्छा देण्यासाठी माजी महापौर मिनाक्षी शिंदे याही उपस्थित होत्या. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुप्त कलागुण आहेत. त्यांची कला सादर करण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळावे यासाठी ठाणे महापालिकेच्या वर्धापनदिनाचे व महिला दिनाचे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी त्यांना महापालिकेने रंगमंच उपलब्ध करुन दिला आहे, या सर्व कार्यक्रमाचे नियोजन अतिशय नेटकेपणाने अधिकारी कर्मचारी करीत असल्याबद्दल अतिरिक्त् आयुक्त (१) संदीप माळवी यांनी सर्वांचे कौतुक केले. चूल आणि मूल या पलीकडे जावून महिलांनी आपले वेगळे विश्व निर्माण केले आहे. अगदी डिफेन्सपासून राष्ट्रपतीपदापर्यंतची सर्व शिखरे महिलांनी सर केलेली आहेत. कोणत्याही पुरूषाला अभिमान वाटावा, असे महिलांचे कर्तृत्व आहे असे सांगत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी ठाणे महापालिकेच्या सर्व महिला अधिकारी कर्मचारी यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर, प्रास्तविकपर भाषणात उपायुक्त् वर्षा दिक्षीत यांनी समाज विकास विभागातर्फे गरीब गरजू महिलांसाठी, मुलींसाठी तसेच विधवा महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रभारी उप माहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी एकापेक्षा एक नृत्य सादर केली. ‘ऐका दाजिबा.., साताऱ्याची गुलछडी.., ये मेरा दिल..,चांदण चांदण झाली रात’ अशी एकापेक्षा एक बहारदार गाणी यावेळी सादर करण्यात आली. तर पारंपारिक सण-उत्सव जसे ‘वारी, नागपंचमी, दहिहंडी, गणेशोत्सव, मंगळागौर’ आदी नृत्याने कार्यक्रमात आणखी रंगत आणली. महिला कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या सोलो नृत्यालाही रसिकांनी भरभरुन दाद देत प्रेक्षागृहात ठेका धरला. या कार्यक्रमात ठाणे महापालिका मुख्यालय, मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यींनी, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी, आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, प्रभाग समितीमधील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच महापालिकेतून सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमास हजेरी लावून गाण्यावर ठेका धरत कार्यक्रमाला अधिक बहार आणली. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अश्विनी कानोलकर यांनी केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading