समता विचार प्रसारक संस्थेतर्फे फेसबुक लाईव्ह मार्फत एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन

लोकवस्तीतील एसएससी च्या विद्यार्थ्यांनी लॉकडाउनच्या काळात निराश न होता पुढील शिक्षणाबाबतची पूर्वतयारी करावी. स्वतःची आवड, अभ्यासाची क्षमता आणि घरातल्या आर्थिक परिस्थितीनुसार योग्य अभ्यासक्रम निवडावा असे आवाहन विद्यार्थ्यांना फेसबुक लाईव्ह मार्फत करण्यात आले. समता विचार प्रसारक संस्थेने एकलव्य सक्षमीकरण योजने अंतर्गत दहावीनंतर काय अर्थात व्यवसाय मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते. दहावीनंतरचे कोर्सेस, लवकर रोजगार मिळवून देणारे कोर्सेस, ११ वीला प्रवेश घेतांना घ्यायची काळजी अशा अनेक प्रश्नांचे निवारण यावेळी करण्यात आले. या सत्रात करियर समुपदेशक सतीश सोनावणे आणि शैलेश मोहिले यांनी मार्गदर्शन केले. सध्या तंत्रज्ञान आणि काम करण्याच्या पद्धती झपाट्याने बदलत आहेत. कोरोनानंतर आयुष्य कसे असेल आणि कोणत्या क्षेत्रात संधी असेल याचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे सांगत सतीश सोनावणे यांनी एसएससी नंतर वोकेशनल आणि प्रोफेशनल अभ्यासक्रमांची माहिती दिली. तर इंजिनीरिंग, आयटीआय, होम सायन्स, हॉटेल व्यवस्थापन, बीएड, डीएड, पोलीस भरती अशा विविध पर्यायांची माहिती शैलेश मोहिले यांनी दिली. ऑनलाईन पद्धतीने कॉलेज प्रवेशाबाबतची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. दहावी झाल्यानंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा, कोणते विषय सोपे अश्या अनेक प्रश्नांवर शैलेश मोहिले यांनी मार्गदर्शन केले. ४११ विद्यार्थी- पालकांनी हा कार्यक्रम लाईव्ह बघितला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading