समता विचार प्रसारक संस्थेतर्फे रत्नाकरी मतकरी यांना ई-आदरांजली

रत्नाकर मतकरी यांनी कोणत्याही विद्यापीठाची मानस शास्त्रातील पदवी संपादन केलेली नव्हती मात्र माणसातील गंड, विकृती, संवेदना, आकांक्षा, नाते संबंधातील तणाव, अघटितता, आकस्मितता या साऱ्या मनोविकारांचे सखोल भान मतकरींना होते, हे त्यांच्या चतुरस्त्र लिखाणातून जाणवते. अशा शब्दात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहिली. समता विचार प्रसारक संस्था आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने फेसबुक लाईव्ह च्या स्वरूपात आयोजित मतकरींच्या स्मरण यात्रेत ते बोलत होते. वंचितांचा रंगमंच सारखी अत्यंत अनोखी आणि क्रांतिकारक संकल्पना त्यांनी मांडली आणि ती लोकवस्तीतल्या मुली – मुलांच्या माध्यमातून प्रत्यक्ष साकारण्यासाठी त्यांनी खूप परिश्रमही घेतले. त्यांचे वंचितांच्या रंगमंचाचे स्वप्न आता कुठे बाळसे धरत होते. ते अधिक समृद्धपणे साकार करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं नाडकर्णी म्हणाले. प्रसिद्ध कलाकार उदय सबनीस यांनी मतकरीं सोबत केलेल्या सिरीयल आणि अन्य कलाकृतींच्या आठवणी जागवत, वंचितांचा रंगमंच हे मतकरींना पडलेले अत्यंत विशाल स्वप्न होते. ते यापुढील काळात अधिकाधिक विकसित करण्याची जबादारी आपण सर्व रंगकर्मींनी उचलली पाहिजे असं सांगितलं. मतकरी कितीही मोठे सेलिब्रेटी साहित्यिक असले तरी ते मुळात एक संवेदनशील माणूस होते. नर्मदा बचाव, एनरॉन विरोधी, गिरणी कामगार, निर्भय बनो अशा विविध आंदोलनात त्यांनी हिरीरीने भाग घेतला. वंचितांचा रंगमंच ही संकल्पना साकारण्यासाठी त्यांनी ठाण्यातल्या लोकवस्त्या निवडल्या आणि आमच्या वंचित एकलव्यांना अभिव्यक्तीच्या माध्यमातून आत्मविश्वास प्रदान केला. एका परिने वंचितांचा रंगमंच आता पोरका झाला अशी खंत संजय मं. गो. यांनी व्यक्त केली. चित्र, कथा, भयकथा, पटकथा, नाट्य अशा साहित्याच्या विविध फॉर्म्स वर मतकरींची हुकूमत होती. एकीकडे मंचावर राजकारणी असतील तर मी तिथे नसेन अशी भूमिका घेणारे मतकरी, अन्याय आणि अभावग्रस्तांच्या बाजूने अत्यंत हिरीरीने आणि पोटतिडिकीने उभे राहत. त्यांनी आपल्या उदार स्वभावाने अनेक माणसे घडवली. अशा शब्दात नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांनी आदरांजली वाहिली. मतकरींसारखंच वंचितांसाठी काम करत राहीन. वंचितांच्या रंगमंचामधून पुढे वंचितांचा सिनेमा उभा करिन अशी भावना दिग्दर्शक निर्माते विजू माने यांनी व्यक्त केली. या ई-
आदरांजली कार्यक्रमात अनेकांनी आपल्या रत्नाकरी मतकरींसोबतच्या आठवणी जागवल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading