सत्य बाहेर न आणल्यास 1 जुलैला मुंब्रा बंदचा जितेंद्र आव्हाडांचा इशारा

गाझीयाबाद येथील एका पोलीस अधिकाऱयाने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतर करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही. मात्र, विकसीत होत असलेल्या मुंब्य्राला बदनाम करण्यासाठी अशा खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी सत्य जाहीर करावे. अन्यथा येत्या 1 जुलैला मुंब्रा बंद करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी मुंब्रा येथे सुमारे 400 मुलांचे धर्मांतर करण्यात आले असल्याचे जाहीर केले होते. कोणताही पुरावा नसताना अशा पद्धतीने भाष्य केल्याबद्दल आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. महाराष्ट्रात सध्या धार्मिक विद्वेषातून शासन पुरस्कृत दंगली होत आहेत. काल गाझीयाबाद येथील एका आयपीएस अधिका-याने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतर झाले असल्याचे जाहीर केले आहे. हा मुंब्रा आणि परिसराला बदनाम करण्याचा विषय तर आहेच; शिवाय हिंदू धर्मालाही बदनाम करण्याचा डाव आहे. हिंदू धर्मातील मुले एवढी मुर्ख आहेत की ती स्वत:चे धर्मांतर करुन घेतील? आपण गाझीयाबादच्या त्या पोलीस अधिकाऱयाला जाहीर आव्हान देत आहोत की त्यांनी पुढे येऊन धर्मांतर करणाऱया मुलांचे नाव-पत्ते जाहीर करावेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत. त्यांनी केवळ चारच नावे जाहीर करावीत. जर खरोखर धर्मांतर झाले असेल तर त्याची दखल पोलीस महासंचालक रजनिश सेठ आणि पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी घ्यायला हवी होती. जर चारशे मुलांचे धर्मांतर केले जात असेल तर हे अधिकारी काय करीत होते? हा प्रकार म्हणजे एका शहराला बदनाम करुन त्याची अर्थव्यवस्था धुळीस मिळविण्याचा प्रयत्न आहे. आज मुंब्रा, कौसा, शिळ या भागात 5 कोटी चौरस फुटांचे अधिकृत बांधकाम सुरु आहे. या घरांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असतानाच अशा खोट्या बातम्या पसरवून अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. धर्मांतराची ही बातमी खोटी आहेच पण, तपासानंतरही ती खोटी निघाली तर काय करायचे. महाराष्टाची निवडणूक जिंकायची आहे म्हणून काय पातळीवरचे राजकारण केले जात आहे. मुंब्य्राला हाताशी धरुन सबंध ठाण्याचे वातावरण खराब करायचे आहे. मग, जितेंद्र आव्हाड तिथे आहेत. पोलीस महासंचालकांनी सांगावे की गाझीयाबादमधून पोलीस अधिकाऱयाने जे सांगितले आहे ते खरे आहे की खोटे आहे? अन्यथा येत्या 1 जुलैला मुंब्रा बंद करुन हिंदू-मुस्लीम यांचा एकत्रित मोर्चा काढू. आमचे शहर असे बदनाम होऊ देणार नाही. या शहाराला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून येथे सर्व धर्मिय लोक गुण्यागोविंदाने राहतात. अशा शहराला बदनाम करणे योग्य नाही. आपण मुंब्रा शहराचे प्रतिनिधीत्व करीत असल्यानेच हा जाब विचारत आहे. अन् मी संविधानावर हात ठेवून धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतली आहे. त्यामुळे ज्या शहरात असे धर्मांतर घडलेच नाही. त्याची बदनामी करणाऱयाला भरपाई करावीच लागेल. या प्रकरणात सरकारला उत्तर द्यावेच लागेल. ज्या पद्धतीने केरळ स्टोरीमध्ये 32 हजार मुलींची खोटी कथा सांगण्यात आली तसाच हा प्रकार असल्याचंही आव्हाड म्हणाले. दिवा येथील भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना मारण्याचा कट रचला आला होता, याबाबत पत्रकारांनी विचारले असता, अमोल केंद्रे आणि रोहिदास मुंडे यांना मारण्यासाठी कट रचण्यात आला होता. सुदैवाने ते त्यांच्या हाती लागले नाहीत म्हणून बचावले. भाजपच्याच कार्यकर्त्यांना मारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कट रचले जात असतील तर काय होणार या शहराचे? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading