शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार गणेशोत्सव आनंदाने व साधेपणाने साजरा करावा – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

राज्यातील कोवीड 19 चा संसर्ग अधिक वाढू नये, यासाठी राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिक व गणेशमंडळांनी यंदा साध्या पद्धतीने व आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा. तसेच सर्व सार्वजनिक गणेशमंडळांनी आरोग्य विषयक उपक्रम घ्यावेत, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी ठाणेकर जनतेला साधेपणाने शासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. श्री. नार्वेकर म्हणाले की, राज्यातील कोवीड संसर्गाचा अधिक प्रसार होऊ नये, यासाठी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी 4 फुटाची तर घरगुती गणेशाची मूर्ती ही 2 फुटाच्या मर्यादेत असावी. शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी धातू किंवा संगमरवरी मुर्तींचे पूजन करावे. शाडूची मूर्ती असल्यास घरच्या घरी विसर्जन करावे. घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळावर विसर्जन करावे.
सार्वजनिक मंडळांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची पूर्व परवानगी घ्यावी. सार्वजनिक मंडळांनी आरोग्य विषयक व सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती प्रदर्शित कराव्यात. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य शिबिरे व रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन श्री. नार्वेकर यांनी केले. शासनाने जे निर्बंध लागू केले आहेत, त्याला कुठलीही शिथिलता गणेशोत्सव काळात देण्यात आली नाही. त्यामुळे या काळात कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, नागरिक मास्कचा वापर करतील व सामाजिक अंतराचे पालन होईल याकडे जनतेने लक्ष द्यावे. श्रींचे आगमन व विसर्जन यांचे मिरवणूक काढू नये. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जन स्थळी जाऊ नये. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. ही बंधने पाळून सर्वांनी श्री गणेशाचा उत्सव चांगल्या पद्धतीने व शांततेत साजरा करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. नार्वेकर यांनी यावेळी केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading