शाळेच्या पहिल्या दिवशी महापौरांनी गुलाबपुष्प देवून केले विद्यार्थ्यांचे स्वागत

राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड आणि ओमिक्रॉन विषाणू नियंत्रण नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत शहरातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असून आज महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेच्या किसननगर येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. आज महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते शाळेची घंटा वाजवून पहिल्या दिवसाची सुरुवात करण्यात आली.

         यावेळी महापौरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत गुलाबपुष्प देवून त्यांचे स्वागत केले. तसेच कोव्हिडच्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेवून त्यांनी डिजीटल क्लास रूमला भेट दिली.

          सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने टप्याटप्याने सर्व शाळा सुरू होत आहेत. कोव्हिड 19 तसेच ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग टाळून शहरातील विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेची विशेष खबरदारी घेत आज पासून पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

        ठाणे महापालिकेचे प्राथमिक शाळेचे वर्ग सुरु करताना शाळेची संपूर्ण स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच शिक्षकांचे प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यासोबतच सुरक्षित अंतर ठेवून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था प्रत्येक शाळेत करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading