शहर पोलिस दलाला नविन वाहनांचे वितरण

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसांना आधुनिक सुसज्ज वाहने उपलब्ध करुन देतानाच त्यांच्या घरांचा देखील प्रश्न मार्गी लागावा यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून सकारात्मक पावले उचलण्यात आल्याचे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. जिल्हा नियोजन निधीतून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला १८ चारचाकी आणि १९ दुचाकी वाहने देण्यात आली. त्यांचा वितरण सोहळा साकेत पोलीस कवायत मैदानावर झाला त्यावेळी ते बोलत होते. कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या १३ वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची पत्रे यावेळी देण्यात आली.
पोलीस आपली काळजी घेतात आपण देखील त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. कुठलाही सण, उत्सव असो पोलीस सदैव कर्तव्यासाठी रस्त्यावर असतात. सामान्य नागरिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी ते चोख सेवा बजावतात. कोरोना काळात कर्तव्य बजावताना निधन झालेल्या पोलीसांच्या कुटुंबियातील एका सदस्याला अनुकंपा तत्वावर तात्काळ नियुक्ती देण्याची पोलीस आयुक्तांनी केलेली कार्यवाही अभिनंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीसांची काळजी घेताना त्यांच्यासाठी घरांची निर्मिती झाली पाहिजे यासाठी सिडको गृहनिर्माण प्रकल्पाच्या सोडतीमध्ये पोलीसांसाठी विशेष कोटा असावा असा निर्णय नगरविकास विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. निवृत्तीनंतर पोलीसांना घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात अभ्यास सुरु असून खाजगी गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये काही सदनिकांच्या माध्यमातून पोलीसांना घरे उपलब्ध करुन देण्याबाबत सकारात्मक दृष्टीने पावले उचलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीसांच्या वसाहतींचा पुर्नविकास गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून करण्यात यावा असे सांगतानाच पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या तक्रारदाराला सौजन्याची वागणूक पोलीसांनी द्यावी, असेही त्यांनी सांगितले. गुन्हेगारांवर वचक बसवितानाच सामान्यांचा विश्वास वृध्दींगत होईल यासाठी पोलीसांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलीस आयुक्तालयाला उपलब्ध करुन देण्यात आलेल्या वाहनेांच्या माध्यमातून गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास ही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
पोलीसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वाहने सुस्थितीत असणे अत्यावश्यक आहे. आज वितरीत करण्यात आलेल्या वाहनांमुळे पोलीस दलाला सक्षम करण्याचा प्रयत्न असून भविष्यातही अशाच प्रकारे सुसज्ज वाहने पोलीसांना उपलब्ध करुन दिली जातील. पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्वावर तातडीने नियुक्ती देण्याचे काम ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने केले आहे. त्याचे अनुकरण अन्य पोलीस आयुक्तालयानीही करावे,असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केले. यावेळी शिंदे आणि आव्हाड यांनी नविन वाहनांना हिरवा झेंडा दाखविला. या वाहनांच्या माध्यमातून संचलन करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading