शहरातील पंधरा तलावांचं लवकरच संवर्धन आणि सुशोभीकरण केले जाणार.

ठाणे शहरातील १५ तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरण केले जाणार आहे. तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरातील तलावांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी विविध कामे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येतात. याच मालिकेत, केंद्र शासनाच्या माध्यमातून अमृत-२ योजनेतंर्गत एकूण १५ तलावांच्या संवर्धन आणि या कामांच्या निविदा अंतिम करून कार्यादेश देण्यात आले आहेत. तसेच काही तलावांच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. या योजनेतील कामांचा आढावा घेत असताना तलावांची सर्व कामे ही सर्वोत्तम दर्जाची होतील याकडे कटाक्ष असावा, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. तसेच, या सर्व कामांचे आयआयटी या संस्थेमार्फत त्रयस्थ लेखापरीक्षण करण्यात येणार असल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले. शहरात सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणाचे दृश्यरुप ठाणेकरांना अनुभवयास मिळत आहे. त्याप्रमाणेच, तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या १५ तलावांमध्ये तुर्फेपाडा, खारीगाव, हरियाली, शिवाजीनगर-कळवा, कौसा, कोलशेत, दातिवली, देसाई, ब्रह्माळा, आंबे-घोसाळे, कचराळी, रायलादेवी, कमल, खिडकाळी आणि जोगिला या तलावांचा समावेश आहे. यासाठी एकूण ५३ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. त्यापैकी २५ टक्के रक्कम टक्के केंद्र शासन, २५ टक्के राज्य शासन देणार आहे. तर, उर्वरित ५० टक्के निधी महापालिकेचा आहे. तलावाच्या सभोवती नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस, ठिकठिकाणी सुका कचरा आणि ओला कचऱ्यासाठी वेगवेगळे डस्टबीन, सुरक्षा रक्षकासाठी केबीन, निर्माल्य कलश, फायबर ग्लास बोट आणि आवश्यकतेनुसार सूचना फलक लावले जातील, याकडे लक्ष द्यावे याबाबतही आयुक्त बांगर यांनी सूचना दिल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading