व्हीव्हीपॅट यंत्रात माहिती लोड करताना उमेदवारांना उपस्थित राहण्याची मुभा देण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी

पारदर्शी निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये सॉफ्टवेअर लोड करण्याची प्रक्रिया करतेवेळी उमेदवार अथवा उमेदवाराच्या प्रतिनिधीस उपस्थित राहण्याची मुभा देण्याची मागणी राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिका-यांकडे केली आहे. इव्हीएमच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यावरून बरेच वाद झाले. सर्वोच्च न्यायालयानं त्यावर व्हीव्हीपॅट या नवीन यंत्राची जोडणी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशातील निकषानुसार मतदान यंत्र, नियंत्रण यंत्र आणि व्हीव्हीपॅट या तिन्ही यंत्रांची संरचना बॅलेट युनिट ते व्हीव्हीपॅट व्हाया कंट्रोल पॅनल अशी असावी असे अपेक्षित होते. मात्र ही अपेक्षा फोल ठरवून ही संरचना बॅलेट युनिट ते कंट्रोल पॅनेल व्हाया व्हीव्हीपॅट अशी करण्यात आली आहे. यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होत आहे असं आव्हाड यांनी निवडणूक निर्णय अधिका-यांच्या लक्षात आणून दिलं आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या काही दिवस आधी मतदान यंत्रावर उमेदवार आणि त्यांच्या निवडणूक चिन्हांचे चित्र लावले जाते तर व्हीव्हीपॅटमध्ये सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही माहिती लोड केली जाते. ही चिन्हे यंत्रामध्ये वर्गीकृत करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. हे करत असतानाच मतदान यंत्र तसंच व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिटमध्ये घोळ केला जाऊ शकतो असा संशय आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. व्हीव्हीपॅटमध्ये आधी मतं नोंदवून नंतर ते कंट्रोल युनिटमध्ये जात असल्यानं त्यामध्ये फेरफार होण्याची दाट शक्यता आहे. याबरोबरच व्हीव्हीपॅटची संरचना ही ट्रान्स रिसिव्हर पध्दतीची असल्यानं ७ सेकंदांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतांमध्ये फेरफार होऊ शकतो. त्यासाठी शंकेचं निरसन होणं गरजेचं असून निवडणूक चिन्हं वर्गीकृत केली जात असताना म्हणजे व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये माहिती अपलोड केली जात असताना निवडणूक लढवत असलेल्या सर्व उमेदवारांना उपस्थित राहण्याची संधी देणे हा उमेदवार म्हणून पदसिध्द अधिकार आहे. त्यामुळं व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये उमेदवारांची माहिती त्यांच्या उपस्थितीतच अपलोड करण्यात यावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading