वृक्ष प्राधिकरण समितीतर्फे धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यासाठी धोरण निश्चित

वृक्ष अधिनियम १९७५ आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशान्वये वृक्षांच्या धोकादायक फांद्या छाटण्याबाबत वृक्ष प्राधिकरणानं निश्चित केलेल्या मार्गदर्शक अटी आणि शर्थींनुसार शास्त्रोक्त पध्दतीनं फांद्यांची छाटणी करण्यासाठीचे धोरण वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आलं. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे धोरण निश्चित करण्यात आलं. महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित तसंच खाजगी अर्जदारांमार्फत विकासकामांमध्ये बाधित एकूण ४१ वृक्ष तोडण्यात येणार असून त्याऐवजी ८ ते १० फूट उंचीच्या ६१५ वृक्षांचं रोपण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे २९९ वृक्षांचं पुनर्रोपण करण्यात येणार असून त्याऐवजी ८ ते १० फूट उंचीच्या १ हजार ४९५ वृक्षांचं रोपण करण्यात येणार आहे. विविध ठिकाणच्या वृक्षांच्या भोवती कॉन्क्रीटीकरण, डांबरीकरण, लाद्या बसवणे, कोबा करणे, पेव्हर ब्लॉक लावणे याकरिता वृक्षाच्या खोडाच्या सभोवताली एक फूट बाय एक फूट जागा मोकळी ठेवावी ज्यामुळे वृक्षास हवा आणि पाणी मिळण्यास अडथळा निर्माण होणार नाही असे आदेश यावेळी देण्यात आले. शहरातील जुन्या, प्राचीन आणि महत्वपूर्ण वृक्षांचं जतन करणं, त्यांची नोंद ठेवणं यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीमार्फत हेरीटेज वृक्षांची यादी करण्याकरिता तज्ञ सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. वृक्ष प्राधिकरणातर्फे वृक्षवल्ली २०२० हे प्रदर्शन आणि स्पर्धा १० ते १२ जानेवारी दरम्यान रेमण्ड मैदानावर आयोजित करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading