वीस वर्षानंतर चोरीचा ऐवज मिळाला परत

ठाणे लोहमार्ग पोलिसांनी वीस वर्षांपूर्वी चोरीस गेलेला सोन्याचा ऐवज शोधून तक्रारदाराला परत केला आहे.यासह बदललेला पत्ता शोधुन अन्य दोघा तक्रारदारांनाही 10 आणि 12 वर्षानंतर ऐवज परत केला आहे. सोनसाखळी चोरटयांचा छडा लावुन हस्तगत केलेला ऐवज मुळ मालकांना देण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर ऐवज प्रदान करण्यात आला अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक स्मिता ढाकणे यांनी दिली. इतक्या वर्षानंतर ऐन गणेशोत्सवात चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याने तक्रारदारांनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले आहेत. रूनवाल नगर येथे राहणाऱ्या प्रिया तुपे यांची 8 ग्रॅम वजनाची सोनसाखळी 2000 साली ठाणे रेल्वे स्थानक परिसरातुन चोरीस गेली होती. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चोरीस गेलेला ऐवज हस्तगत केला. तसेच फिर्यादी प्रिया यांचा शोध घेवुन न्यायालयाच्या परवानगीने त्यांचे वडील महेश तुपे यांना सोनसाखळी परत केली. वीस वर्षांपूर्वी चोरी झालेला ऐवज परत मिळाल्याने महेश तुपे यांनी पोलीसांचे आभार मानले. दुसऱ्या घटनेत पुण्यातील अमृतसिंह गरेवाल यांची दोन तोळे वजनाची सोनसाखळी 2011 साली चोरीस गेली होती. तक्रारदारांचा पत्ता बदलल्याने ऐवज परत करणे शक्य होत नव्हते. पोलिसांनी मुंबई, ठाणे, पुणे येथे वर्षभर शोध घेतला. अखेरीस गरेवाल पुण्यात असल्याचे कळल्याने पोलिसांनी दहा वर्षानंतर त्यांचा ऐवज सुखरूप परत केला. तर तिसऱ्या घटनेत आझादनगर येथे राहणारे रेल्वे प्रवाशी अमित कार्ले यांच्या 32 ग्रॅम वजनाच्या तीन सोनसाखळ्या 2008 रोजी चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. या गुन्ह्याचाही यशस्वी तपास करून लोहमार्ग पोलिसांनी तब्बल 12 वर्षानंतर कार्ले यांचा बदललेला पत्ता शोधुन ऐवज परत केला. लोहमार्ग पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांच्या फिर्यादींना त्यांचा मुदेमाल परत करण्याच्या उपक्रमाअंतर्गत ठाणे लोहमार्ग पोलीसांनी कोरोनामुळे आपल्या कामकाजात कोणताही खंड पडु न देता सोन्याचा ऐवज परत केल्याने प्रवाश्यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading