विहंग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मंगळागौर उत्सवाचं आयोजन

विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून साजरे होणारे महिलांसाठीचे मंगळागौर उत्सव गेले २ वर्ष कोरोनामुळे आयोजित करता आले नाहीत. परंतु आता कोरोना निर्बंध नसल्यामुळे यावर्षी विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मंगळागौर पूजन आणि विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना रोजच्या रहाटगाड्यातून चार निवांत आनंदाचे क्षण मिळावे, त्यांचा विरंगुळा होऊन त्यांचात आत्मविश्वास वाढीस लागावा यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. याशिवाय नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या संकल्पनेतून ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सरवर सामाजिक जागरूकतेसाठी महिलांसाठी ट्रस्ट मार्फत विविध उपक्रम आयोजित केले जातात. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात येत्या मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी मंगळागौरी पूजन आणि खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे. मंगळागौरच्या या उत्सवाला स्पर्धेचे रूप देण्यात आले आहे. फ्युजन आणि पारंपारिक अश्या दोन वेगवेगळ्या श्रेणीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पारंपारिक श्रेणीत तीन बक्षिसे असून प्रथम पारितोषिक ११ हजार रूपये, द्वितीय पारितोषिक साडेसात हजार तर तृतीय पारितोषिक पाच हजार रूपये असेल. फ्युजन श्रेणीत सुद्धा तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच सर्व ग्रुपमधून ज्या ग्रुपने हटके सादरीकरण केले असेल त्या ग्रुपला “सुपरस्टार-२०२२” म्हणून विशेष बक्षिस म्हणून १५ हजार रूपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय कार्यक्रमातील सर्व प्रेक्षकांमधून “लकी ड्रॉ ” सुद्धा काढण्यात येणार आहे. लकी ड्रॉ विजेत्यांना देखील आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा परीषा सरनाईक यांनी या उत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व महिलांच्या उत्साहात भर घालून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading