विद्यार्थ्यांशी संवाद साधत महापौरांनी घेतला नागरिकशास्त्राचा धडा

करोना म्हणजे काय? तो कशामुळे होतो. करोनापासून दूर राहण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, तसेच नागरिकांची कर्तव्ये कोणती? नगरसेवक म्हणजे काय, महानगरपालिकेची रचना कशी असते? नागरिकांची कर्तव्ये आणि अधिकार कोणते? शहराचा महापौर कसा निवडून येतो, असे प्रश्न विचारुन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका शाळा क्र. 23 मधील आठवीच्या वर्गात नागरिकशास्त्राचा धडा घेतला. दीड वर्षापासून घरी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांचे मनोबल वाढावे यासाठी महापौरांनी स्वत: किसननगर आणि ढोकाळी येथील शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. महापालिका शाळेत येणारी मुले ही गरीब आणि गरजू वर्गातील असतात, या मुलांना पुन्हा शाळेत येण्यासाठी त्यांची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. पावणेदोन वर्षे घरी असलेल्या या मुलांनी या काळात काय केले? ऑनलाईन शिक्षण आवडत होते का? प्रत्येक मुलाचे नाव विचारुन आपण सुट्टीच्या काळाचा कसा वापर केला, भविष्यात तुम्हाला काय बनायचे आहे, कोणत्या क्षेत्रात करियर करायचे आहे, अशा प्रकारे महापौरांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. तसंच आनंद विश्व गुरूकुल या महाविद्यालयास भेट देवून तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आज दीड वर्षानी तुम्ही प्रथम महाविद्यालयात पाऊल ठेवले. अकरावी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने उत्तीर्ण झाला आहात. परंतु शाळा- महाविद्यालये ही आपल्या आयुष्यात एक महत्वाचे स्थान निर्माण करून आपल्या करियरची दिशा ठरवित असतात. पावणे दोन वर्षानंतर आपण जेव्हा महाविद्यालयात आलात, आपल्यासमोर नवी स्वप्ने, आव्हाने असतील ती निश्चित पूर्ण करण्याचा प्रत्येकांनी प्रयत्न करा असं महापौरांनी यावेळी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading