वाहतूक शाखेतर्फे अधिकारी आणि अंमलदारांचा गौरव

ऊन, पाऊस, वारा आणि प्रदूषण यांची तमा न बाळगता दिवसरात्र मेहनत करून अशा प्रकारच्या कारवाया यशस्वी करणा-या अधिकारी आणि अंमलदारांना वाहतूक शाखेतर्फे प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांविरूध्द ठाणे वाहतूक शाखेमार्फत कारवाई करून तसेच अनेक नागरिक वाहनांचा दंड कित्येक वर्षे भरणा करीत नसल्याने अशा वाहनचालकांविरूध्द दंड रक्कम वसूल करण्याची मोहीम धडाक्याने सुरू करण्यात आली आहे. मुंब्रा वाहतूक उपविभागामार्फत जून महिन्यामध्ये सर्वाधिक ई-चलान कारवाई आणि सर्वाधिक पेंडींग ई-चलान तडजोड शुल्क वसूली करण्यात आली आहे. यासाठी मुंब्रा वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांना गौरविण्यात आले. तसेच वैयक्तिक ई-चलान मशिनद्वारे सर्वाधिक कारवाई बाबत मुंब्रा वाहतूक उपविभागाचे पोलीस हवालदार अनिल देसाई, कोळसेवाडी वाहतूक उपविभागाचे शांताराम सांगळे, उल्हासनगर वाहतूक उपविभागाचे पोलीस हवालदार रावसाहेब काटकर यांना गौरविण्यात आले आहे. तसेच काळी काच, प्रेशर हॉर्न, मॉडिफाईड सायलेन्सर, ई-चलान वसूली यांच्या एकत्रित कारवायांमध्ये कल्याण वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी सर्वाधिक कारवाया केल्या आहेत. त्यानंतर कासारवडवली वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड आणि कळवा वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चांगल्या कारवाया केल्याने त्यांना गौरविण्यात आले. कोरोना काळात लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणा-या विविध वाहनचालकांविरूध्द वाहतूक शाखेची मोहीम अजून तीव्र करण्यात येणार असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांविरूध्द जास्तीत जास्त कारवाया करणा-या अधिकारी आणि अंमलदारांचा उत्साह वाढविण्यासाठी वाहतूक शाखेमार्फत त्यांना प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading