कोपरीतील एसआरए प्रकल्पातील लाभार्थ्यांचे अनेक महिन्यांचे भाडे विकासकाने थकवल्याने स्थानिक रहिवाशांचं उपोषण

कोपरीतील एसआरए प्रकल्पातील लाभार्थ्यांचे अनेक महिन्यांचे भाडे विकासकाने थकवल्याने स्थानिक रहिवाशांनी थेट मुंबईतील आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण सुरू केले. महाविकास आघाडीच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. तसेच लवकरात लवकर मागील 19 महिन्याचे भाडे मिळावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, निरंजन डावखरे यांनी आंदोलनकर्त्याची भेट देऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले. कोपरीतील सिद्धार्थनगर, धोबीघाट येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून समन्वय आणि मित्रधाम हे दोन पुन:र्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पाचे विकासक व्हिराज बिल्डकॉन या बांधकाम कंपनीची नेमणूक केली आहे. या प्रकल्पात 355 झोपडीधारक लाभार्थी असुन विकासकाने या झोपडीधारकांना 19 महिन्यांचे भाडे दिलेले नसल्याने लाभार्थ्यानी एसआरए प्राधिकरणाकडे तक्रारी केल्या. त्यामुळे,एसआरएने व्यावसायिक इमारतीचे बांधकाम थांबवले.तरीही विकासक बधत नसुन विविध कट कारस्थाने रचुन लाभार्थी रहिवाश्याना त्यांच्या मुलभूत हक्कापासुन वंचित ठेवत असल्याने संतप्त रहिवाश्यांनी भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काळे कपडे परिधान करून थेट मुंबईतील आझाद मैदान गाठले. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी एसआरएच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात घ्यावी. ठरल्याप्रमाणे आमचे थकीत भाडे मिळावे. या संदर्भात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधले. यावेळी आंदोलक रहिवाश्यांनी विकासकाच्या विरोधात घोषणाबाजी करीत घरभाडे आणि हक्काचे घरकुल तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading