वसंत डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयाला पहिली वातानुकुलित रूग्णवाहिका

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयाला पहिली वातानुकुलित रूग्णवाहिका मिळाली आहे. आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते या रूग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं. जिल्हा रूग्णालयाच्या ताफ्यात सध्या ५ रूग्णवाहिका आहेत. मात्र गरोदर माता, डोळ्यांचे रूग्ण आणि अत्यवस्थ स्थितीतील रूग्णांना मुंबईला हलवण्यासाठी गरीब रूग्णांच्या नातेवाईकांना खाजगी रूग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागतो. या पार्श्वभूमीवर आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयाला आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत १६ लाखांची वातानुकुलित रूग्णवाहिका मंजूर केली होती. एका कार्यक्रमात ही रूग्णवाहिका जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. या वातानुकुलित रूग्णवाहिकेत ऑक्सीजन सिलेंडर तसंच तात्काळ उपचारासाठी आवश्यक ते साहित्य बसवण्यात येईल. त्यातून आपत्कालीन परिस्थिती आणि दुर्गम भागातील अत्यवस्थ रूग्णांना जिल्हा रूग्णालयात आणण्यासाठी फायदा होईल असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading