वंचितांच्या रंगमंचामधून समाज घडवण्याचं कार्य – विजय केंकरे

अत्यंत यशस्वी लेखक आणि नाटककार म्हणून त्यातच रमून न राहता रत्नाकर मतकरींनी समाजाशी जोडून राहिले. बालनाट्यामधून बाल मनं तयार करण्यापासून लोककथा ७८ सारख्या नाटकातून समाजातील ज्वलंत समस्या लोकांपुढे मांडण्यातून सुरु झालेला त्यांच्या विचारांचा प्रवास वंचितांच्या रंगमंचाने प्रत्यक्ष आकाराला आला. त्यातून माणूस आणि पर्यायाने समाज घडवण्याचे काम त्यांनी सतत केलं आहे. असे उद्गार जेष्ठ दिग्दर्शक आणि नाट्यकर्मी विजय केंकरे यांनी समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत मतकरी स्मृती मालेच्या समारोपाच्या सत्रात बोलताना काढले. भावनेला हात घालून प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त करणे आणि आपले विचार सक्षमपणे त्यांच्या पर्यंत पोहचवणे, हे मतकरींच्या नाटकांचे वैशिष्ट्य आहे. त्याचा उपयोग करून त्यांनी वंचितांच्या रंगमंचामधून मुलांमध्ये आजच्या काळासाठी अतिशय समर्पक असा समतेचा विचार रुजवला, हे त्यांचं महत्वाचं कार्य आहे. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी मतकरी यांच्या स्मृती जागवल्या. मतकरी यांच्या संकल्पनेने ठाण्यात समता विचार प्रसारक संस्थेने वंचितांचा रंगमंच हा उपक्रम सुरु केला. वस्त्या वस्त्यातील मुलांनी आपल्या आयुष्यात आणि सभोवताली घडणाऱ्या घटना समजून घेऊन त्यावर स्वतः लिहिलेल्या आणि बसवलेल्या नाटकांतून व्यक्त व्हावे अशी ही कल्पना ठाण्यातील वस्तींतील मुलांनी उचलून धरली आणि गेली ७ वर्ष हा उपक्रम या शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात झळकत राहिला. मतकरींच्या आकस्मित निधनानंतर त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी गेले वर्षभर प्रत्येक महिन्यात १७ तारखेला संस्थेतर्फे मतकरी स्मृती माला आयोजित करण्यात आली. चित्रकला, अभिवाचन, अभिव्यक्ती, नृत्य, नाटिका अशा कलांबरोबरच ऑनलाईन शिक्षण, शेतकरी आंदोलन, मिट्टी सत्याग्रह अशा सद्य स्थितीतील ज्वलंत मुद्द्यांवर आधारित कार्यक्रम घेण्यात आले. या सर्व कार्यक्रमांतील सादरीकरणातून काही निवडक सादरीकरण समारोपाच्या कार्यक्रमात कोलाजच्या रूपात दाखवण्यात आली. चित्रकला कार्यक्रमातून निवडक १२ चित्रे तसेच प्रकेत ठाकूर याने काढलेली मतकरींची चित्रे आणि मतकरींनी स्वतः नर्मदा आंदोलनावेळी नर्मदा घाटीत काढलेली चित्रे दाखवण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading