लॉकडाऊन विरोधात सोमवारी गटई कामगारांचे धूर आंदोलन

लॉकडाऊनमुळे गटई कामागारांची आता उपासमार होऊ लागली असून गटई चर्मकार समाज कामगार संघटनेच्या वतीनं धूर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. चप्पल आणि छत्री दुरुस्त करुन पोट भरणार्‍या वर्गाचे गटई स्टॉल दोन तासांसाठी सुरु करण्याची मागणी करुनही प्रतिसाद दिला नसल्याने संतप्त झालेल्या गटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांनी धूर आंदोलनाचा इशारा दिला आहे. चव्हाण यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. कोरोनावर मात करणेसाठी या लॉकडाऊनची गरज असली तरी हातावर पोट असणार्‍यांचे हाल सुरू आहेत. 22 मार्चपासून गटई स्टॉल बंद असल्याने गटई व्यवसाय करणार्‍यांच्या उदरभरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे ठाणे शहरात मद्यविक्री सुरु करण्यात आली आहे. अनेक लॉज सुरु आहेत. अशा स्थितीमध्ये केवळ गरीबांच्या पोटावरच पाय देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. गटई कामगारांच्या स्टॉलवर कधीच गर्दी होत नसल्याने फिजीकल डिस्टन्सींगचेही पालन योग्य रितीने होऊ शकते. तरीदेखील गटई स्टॉल उघडण्यास मनाई करण्यात येत असल्याने या वर्गाची उपासमार होत आहे. त्यातच या स्टॉलचा कर, वीजबिल भरण्याची सक्ती करण्यात येत असून ही सक्ती रद्द करावी आणि वीजबिल, मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांवर 19 जुलैपर्यंत निर्णय न घेतल्यास 20 जुलैला सकाळी 11 वाजता शेकडो चर्मकार बांधव भिक मागून आणलेला शिधा पालिका मुख्यालयासमोर चूल पेटवून शिजवतील तसेच याच ठिकाणी ठाण मांडून बसतील असा इशारा राजाभाऊ चव्हाण यांनी दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading