रेल्वेतील चोरांनी दाखवला आमदारांनाही आपला हिसका

विदर्भातील तीन आमदारांना मुंबई प्रवासादरम्यान चोरटयांनी चांगलाच हिसका दाखवला आहे.रेल्वे प्रवासादरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस आणि शिवसेना आमदारांचे मोबाईल आणि रोकड चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या.याप्रकरणी कल्याण आणि ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सर्रास होत असलेल्या अशा चोरीच्या घटनांमुळे रेल्वे प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यात आमदारांचे ओळ्खपत्रही चोराने लांबवल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईत सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे.या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघामधील काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे हे सोमवारी पहाटे विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईत येत होते.त्यांच्यासोबत त्यांची पत्नीदेखील होती.प्रवासादरम्यान ते झोपलेले असताना चोरट्यांनी त्यांच्या पत्नीची पर्स लांबवली.या पर्समध्ये 24 हजार रूपयांची रोकड, मोबाईल आणि महत्वाची कागदपत्रे होती.यावेळी बोन्द्रे यांनी चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.पण चोरटा पसार होण्यात यशस्वी झाला.याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सीसी टीव्ही चित्रणाच्या आधारे चोरट्याचा शोध सुरु केला आहे.तर,बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर हेदेखील सकाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईत येत होते.प्रवासादरम्यान चोरट्यांनी त्यांच्याही खिशातील 56 हजार रूपयांचा मोबाईल आणि 10 हजार रूपयांची रोकड लांबवली.सिंदखेडराजा मतदार संघातील आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या स्वीय सहाय्यकाची बॅगही चोरटयांनी लांबवली असून या बॅगमध्ये कागदपत्रे होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading