रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांना दाखल करून घेण्याच्या पालिका आयुक्तांच्या सूचना

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काम करणाऱ्या सर्व विभाग कर्मचारी, अधिकारी यांनी समन्वय साधून आरोग्य सेवा, रुग्ण सेवा हेच सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य ठेवले पाहिजे, रुग्णालयात दैनंदिन विविध उपचारांसाठी रुग्ण्‍ येत असून सद्यस्थितीत रुग्णांची संख्या वाढली असली तरी दाखल करण्यायोग्य एकही रुग्ण नाकारला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्वांशी सौजन्याने वागा, रुग्णांना उपचार मिळण्यात कोणतीही हयगय होता कामा नये अशा सक्त सूचना आज ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत सर्व विभागप्रमुखांना दिल्या. कर्मचारी, नर्स, औषध पुरवठा, सुरक्षा यंत्रणा, यंत्रसामग्री या सगळ्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच काही प्रशासकीय बदल करण्यात आले.

आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी ठामपा मुख्यालयातील झेंडावंदन कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आयुक्तांनी बैठक घेतली. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयास भेट दिली होती, यावेळी त्यांनी दिलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.

रुग्णालयात ठाण्यासह आजूबाजूच्या महानगरपालिका तसेच ग्रामीण भागातील रुग्ण हे उपचारासाठी येत असतात, कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उपचार मिळतील याबाबतची काळजी सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी. रुग्णाला वेळेवर उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, शिफ्टनुसार बदलणारा कर्मचारी वर्ग यांनी वेळेवेर उपस्थित राहण्याच्या सूचनाही आयुक्त्‍ श्री. बांगर यांनी यावेळी दिल्या.

प्रत्येक विभागाच्या रुग्णकक्षामध्ये काटेकोर शिस्तीचे पालन होईल हे पाहण्यासाठी संबंधित विभागप्रमुख जबाबदार राहतील – आयुक्तांच्या सूचना

वॉर्डमधील नर्सेसची ज्युनिअर तसेच रेसीडन्स डॉक्टरांची उपस्थिती ऑन कॉल वैद्यकीय अधिकारी यांची कर्तव्य कालावधीतील संपूर्ण रुग्णालयातील उपस्थिती, बाह्यरुग्ण विभागात वरिष्ठ विशेष तज्ज्ञ यांची उपस्थिती, रुग्णकक्षातील रुग्णांचे व्यवस्थापन तसेच दिली जाणारी उपचार पध्दती यांबाबत स्वत: विभागप्रमुख जबाबदार राहतील अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. त्याचप्रमाणे दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा विभागप्रमुख स्वत: प्रत्येक रुग्ण्कक्षेमध्ये राऊंड घेतील व रुग्णाची परिस्थिती तपासून आवश्यकतेनुसार आवश्यक ती कार्यवाही करतील अशा सूचना आयुक्त्‍ श्री. बांगर यांनी बैठकीत दिल्या. या व्यतिरिक्त्‍ अधिष्ठाता यांनी स्वत: त्यांच्या स्वत:च्या विभागाव्यतिरिक्त्‍ दररोज किमान दोन विभागांच्या रुग्ण्कक्षामध्ये राऊंड घेणे बंधनकारक राहील अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या. अधिष्ठाता यांनी हॉस्टेल, लॉण्ड्री, कॅन्टीन, भोजनगृह या ठिकाणी वेळोवळी भेट दिली जाईल याची दक्षता घ्यावी.

सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय हे सेवालाल नगर येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे, परंतु याबाबत रुग्णांना पुरेशी माहिती नाही. जर आपल्याकडे बेड उपलब्ध नसल्यास रुग्णांना सिव्हिल किंवा मुंबईला इतर रुग्णालयात पाठवावे लागल्यास त्यांना आपल्या रुग्णालय प्रशासनाने रुग्णवाहिका प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच रुग्णांना लागणारी औषधे ही रुग्णालयातच उपलब्ध होतील याकडे लक्ष द्यावे. औषध भांडार विभागात औषधांचा साठा नियमित उपलब्ध असेल या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच ज्या चाचण्या रुग्णालयात केल्या जातात त्या चाचण्या रुग्णालयातच होतील याबाबत दक्षता घेण्यात यावी. चाचण्या करण्यासाठी रुग्णांना इतरत्र पाठविण्यात येवू नये असेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.
प्रशासकीय कामकाजात बदल
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रशासकीय कामकाजात देखील आयुक्तांनी बदल केले असून नवीन कार्यालयीन अधीक्षक व लिपिकांची नेमणूक करण्यात आली असून सदर अधिकाऱ्यांनाही कामकाजाबाबत सूचना करण्यात आल्या. यापुढे मुख्यालयाला सादर करण्यात येणारे प्रस्ताव व इतर सर्व प्रशासकीय कामे ही वैद्यकीय अधिष्ठाता व डॉक्टर्स यांनी न करता सर्व कामे ही कार्यालयीन अधीक्षकांच्या मार्फत केली जातील. रुग्णालयाचे अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक यांनी फक्त रुग्णसेवेशी संबंधित कामकाजावर लक्ष ठेवून त्यामध्ये सुधार होईल याकडे लक्ष द्यावे. तसेच रुग्णालयामध्ये सुरू असणारी भरती ही निरंतर प्रक्रिया असल्याने वेळोवेळी निर्माण होत असलेल्या रिक्त जागांचा आढावा घेवून भरती प्रक्रिया चालूच ठेवावी तसेच काही संवर्गातील विशेष तज्ज्ञ उपलब्ध होण्यास अडचणी येत असतील तर अतिरिक्त्‍ वेतन देवून सदर विशेष तज्ज्ञ उपलब्ध करुन घ्यावेत.

रुग्णांशी सौजन्यपूर्ण वागा रुग्णालयात येणारा रुग्ण हा आजारांनी हतबल झालेला असतो, अशावेळी रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांसोबत डॉक्टर्स, नर्स यांनी सौजन्याची वागणूक ठेवण्याचा सल्लाही यावेळी आयुक्त्‍ श्री. बांगर यांनी दिला. त्याचबरोबर रुग्णालयात असलेल्या सुरक्षारक्षकांनी देखील रुगणालयात येणाऱ्या रुग्णांशी नीट वागावे. रुग्णालयात शिस्तीचे वातावरण असावे. तसेच डॉक्टरांना त्यांना असलेल्या अडचणीबाबत थेट मला संपर्क करावा असे सांगून आयुक्तांनी आपला भ्रमणध्वनीक्रमांक सर्व विभागप्रमुखांना शेअर केला.

रुग्णालयांच्या दुरूस्तीचे काम लवकरच होणार छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला असून लवकरच रुग्णालयांच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती करताना कोणत्याही प्रकारे सद्यस्थितीतील रुग्णांना अडचण निर्माण होणार नाही या दृष्टीने एकेक मजल्याचे काम हाती घेवून ते पूर्ण केले जाणार आहे. यामुळे दुसऱ्या मजल्यावर अतिरिक्त्‍ बेडची सोय केली जाणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, वैद्यकीय अधिष्छाता डॉ. राकेश बारोट, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगांवकर व विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading