राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात मूक निदर्शने

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील गांधी उद्यानामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मूक निदर्शने केली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राची माती जगायला आणि जगवायला शिकवते; त्यामुळे अराजक माजवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्राची माती हे अराजक सहन करणार नाही, असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर काल एसटी कर्मचार्‍यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने केली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या फिती बांधल्या होत्या. काल आम्ही सांगितले होते की आमचे कार्यकर्ते कायदा हातात घेणार नाहीत. कारण आम्ही एसटी कर्मचार्‍यांच्या विरोधात नाही. मात्र, आज तीन एसटी कर्मचारी संघटनांच्या बातम्या वाचायल्या मिळाल्या. या तिन्ही संघटनांनी घडलेल्या प्रकाराचा धिक्कार केला आहे. ज्यांनी हल्ला केला त्यापैकी अनेकांच्या रक्तामध्ये मद्याचे अंश सापडले. कालची घटना ही महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी होती. महाराष्ट्रात असे कधीच घडले नव्हते. शरद पवार हे घरात आराम करीत होते. त्यावेळी घरामध्ये शरद पवार यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि नात असे तिघेच होते. त्यावेळी या लोकांनी घरावर हल्ला केला. बाहेर जमलेली गर्दी पाहून नातीने दरवाजे बंद केले. मात्र, या हल्लेखोरांनी जर दरवाजा तोडला असता तर किती भयानक प्रकार घडला असता; आंदोलकांनी सरकारला लक्ष्य केले असते तर समजू शकतो. पण, 82 वर्षाच्या माणसाला लक्ष्य करुन काय साध्य करायचे होते? शरद पवार यांनी कालच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले होते. मात्र, आम्ही सर्व गांधीवादी आहोत. आता असेच दिसून येत आहे की, महात्मा गांधींच्या हत्येच्या वेळी समाजामध्ये जे विष पेरण्यात आले होते ते वल्लभभाई पटेल यांनी आपल्या पत्रात लिहिले होते की, गांधीजींच्या हत्येच्या आधी काही जणांनी समाजात विष पेरण्यात आले होते. त्यातूनच गांधीहत्या झाली. आताही असेच विष पेरण्याचे काम सुरु आहे. पवारांचा द्वेष हा व्यक्तीगत स्वार्थासाठीच ही विषपेरणी सुरु आहे. या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने शरद पवारांवर टीका करताना फ्रेंच राज्यक्रांतीचा दाखला दिला आहे. पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की सोळावा लुईस आणि मॅरी अँटोनी यांच्यासह 50 हजार जणांची गिलोटीनखाली मुंडकी छाटण्यात आले होते. या लोकांना महाराष्ट्रातही हेच करायचे आहे का? ज्या प्रकाराने अमरावतीमधील एक नेता बोलला आहे. महाराष्ट्रामध्ये अराजक माजवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. पवारांचे वाईट दिवस सुरु झाले आहेत, असे म्हणणार्‍यांनी याचा विचार करावा की पवारांच्या नखाएवढीही आपणाला सर नाही. या महाराष्ट्राचे राजकारण पवारांभोवतीच फिरत असते, हे टीका करणार्‍याने ध्यानात घ्यायला हवा. पवारांवर प्रेम करणार्‍या चार पिढ्या आहेत. आज जे काही चालू आहे ते भितीपोटीच आहे. 82 वर्षांच्या वृद्धाला घाबरलेले हे लोक शरद पवार यांच्यावर शाब्दीक हल्ले करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता तर शारीरिक हल्ले करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पवार हे मोठ्या मनाचे माणूस आहेत. लोकांची माथी भडकावणे हा गुन्हा आहे. सावधान शरद पवार अशा आशयाची पोस्टर्स छापण्यात आली होती. तरीही, अशा हल्ल्यांना शरद पवार घाबरणारे नाहीत. ते पोलिसांच्या गराड्यात रहात नाहीत. अन् जर हिमंत असेल तर फ्रेंच राज्यक्रांतीसारखी कृती करुन दाखवा, आमचे हे खुले आव्हान आहे. जनताच आता कोणाचे वाईट दिवस आले आहेत हे दाखवून देईल, असे सांगितले. या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी ही मूक निदर्शने करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading